नरेंद्र मोदींची रथयात्रा सुरू

गुजराथचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी आगामी विधानसभा लक्षात घेऊन निवडणूक प्रचाराचा शुभारंभ आज केला आहे. स्वामी विवेकानंदांनी १५० वर्षांपूर्वी शिकागो येथे केलेल्या ऐतिहासिक भाषणाची स्मृती म्हणून विवेकानंद युवा विकास यात्रेचा शुभारंभ आज त्यांनी मेहसाणा जिल्ह्यातील बेचरजी यथून केला आहे. ही यात्रा राज्यातील सर्व १८२ विधानसभा मतदारसंघातून फिरणार आहे. या यात्रेला भाजपचे वरीष्ठ नेते अरूण जेटली आणि राजनाथसिंह हेही उपस्थित आहेत.

याच गावापासून यात्रा सुरू करण्यामागे या गावाजवळच मारूती सुझुकीचा नवा प्रकल्प सुरू होत आहे व गुजराथचा विकास  हा महत्त्वाचा मुद्दा आहे असे सांगितले जात आहे. २००२ सालच्या निवडणुकांपूर्वीही मोदी यांनी अशीच गौरव रथयात्रा काढली होती. यंदाच्या यात्रेसाठी त्यांनी भाजपचे वरीष्ठ नेते लालकृष्ण आडवानी यांनी त्यांच्या जनचेतना यात्रेसाठी वापरलेला रथच वापरण्याचा निर्णय घेतला आहे.

आगामी विधानसभा निवडणुकांत मोदींच्या विजयाची खात्री दिली जात असली तरी केशुभाई पटेल यांनी स्थापलेला नवा पक्ष आणि काँग्रेसने महिलांसाठी मोफत घरांची केलेली घोषणा यामुळे मोदी यांच्यापुढच्या अडचणी थोड्या वाढल्या असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. त्यातच जनता युनायटेड दलाने मोदी विरोधांत निवडणूक लढविण्याची केलेली घोषणा आणि बिहार मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा मोदी विरोधातला प्रचार यामुळेही मोदी अधिक सावध झाले आहेत असेही सांगितले जात आहे.

Leave a Comment