कार्यालयीन जागांसाठीची मागणी पुण्यात घटली

पुणे दि.११ – ऑफिस कार्यालयांसाठीच्या मागणीत पुण्यात गेल्या तिमाहीत घट नोंदविली गेली आहे. जागतिक मंदी आणि स्थनिक बाजारपेठेतील अनिश्चितता यामुळे सर्वच क्षेत्रातील उद्योग व्यवसायांनी आपल्या विस्तार कार्यक्रमांबाबत घेतलेली सावध भूमिका हेच यामागचे मुख्य कारण असल्याचे समजते.

नाईट फ्रँक या रिअल इस्टेट क्षेत्रातील सल्लागार फर्मकडून करण्यात आलेल्या दुसर्‍या तिमाहीचा अहवाल नुकताच प्रसिद्ध करण्यात आला असून त्यात ही बाब स्पष्ट करण्यात आली आहे. गतवर्षीच्या तुलनेत चालू वर्षातील एप्रिल ते मार्च २०१२-१३ या काळातील दुसर्‍या तिमाहीत जागांची मागणी २४ टक्कयांनी घटली असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. पुण्यातील कमर्शिअल जागांचे मुख्य ग्राहक आयटी व त्यासंबंधीत सेवा क्षेत्रातील आहेत. जागतिक मंदीचा फटका या उद्योगांना बसला आहे. त्यातच येत्या सहा महिन्यात पुण्यात तब्बल ४० लाख चौरस फूट कमर्शिअल स्पेस उपलब्ध होते आहे.

जोन्स लँड लास्ले इंडियाच्या पुणे विभागाचे व्यवस्थापकीय संचालक संजय बजाज याविषयी मत देताना म्हणाले की केवळ पुण्यातच नव्हे तर राष्ट्रीय पातळीवरच व्यावसायिक जागांची मागणी कमी झाली आहे. मात्र ही परिस्थिती अशीच राहील असे मात्र नाही. बंगलोर, चेन्नई तसेच मुंबईतील अनेक आयटी कंपन्या त्यांचा विस्तार करण्यासाठी पुण्याचा गंभीरपणे विचार करत आहेत. मात्र सध्याच्या ट्रेंडमध्ये पुण्यात छोट्या जागांना अधिक मागणी असून सातशे ते अकराशे चौरस फुटांपर्यंतच्या जागांची कमतरताच जाणवते आहे. अर्थात मोठ्या जागांची मागणी मात्र म्हणावी तशी जोरावर नाही हे सत्य आहे.

Leave a Comment