नवी दिल्ली: काँग्रेस सरचिटणीस राहुल गांधी यांच्यावर तरुणीचे अपहरण आणि बलात्काराचा आरोप करून त्यांची बदनामी करण्याचे कारस्थान उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या इशार्यानुसार करण्यात आल्याचा दावा मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात करण्यात आला. या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली असून मागच्या काही काळापासून काँग्रेस आणि समाजवादी पक्षात सुरू असलेला मधुचंद्र या निमित्ताने संपुष्टात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राहुल यांनी एका तरुणीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याची तक्रार माजी आमदार किशोर समरिते यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात केली होती. ही तक्रार खोटी असल्याचे निष्पन्न झाल्याने उच्च न्यायालयाने समरिते यांना ५० लाख रुपयांचा दंड करून त्यांच्या या कारस्थानाची केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले होते.
या निर्णयाच्या विरोधात समरिते यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. त्यांच्या याचिकेची सुनावणी न्या. बी. एस. चौहान आणि न्या. स्वतंत्र कुमार यांच्या खंडपीठासमोर सुरू आहे. या सुनावणी दरम्यान समरिते यांच्या वकील कामिनी जयस्वाल यांनी या कारास्थानामागचे सूत्रधार अखिलेश यादव असल्याचा गौप्यस्फोट केला. ही माहिती सीबीआयला दिलेल्या जबाबातही देण्यात आल्याचे जयस्वाल यांनी स्पष्ट केले.
उत्तर प्रदेशचे सरकारी वकील रत्नाकर दास यांनी मात्र जयस्वाल यांच्या या आरोपावर तीव्र आक्षेप घेतला. यासंबंधी शपथपत्र सादर करण्यासाठी आपल्याला सरकारकडून अनुमतीची आवश्यकता असल्याचे त्यांनी न्यायालयाला सांगितले. खटल्याची पुढील सुनावणी दि. १७ सप्टेंबर रोजी होईल.
केंद्रात अणुउर्जा विधेयकावरून डावे पक्ष आणि भारतीय जनता पक्ष यांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला तेव्हा सपचे अध्यक्ष मुलायम सिंग यांनी काँग्रेस आणि सरकारला दिलासा दिला होता. तेव्हापासून काँग्रेस आणि सपचे संबंध ‘मुलायम’ झाले आहेत. मात्र या गौप्यस्फोटामुळे हे संबंध ताणले जाण्याची चिन्ह आहेत. विशेष म्हणजे अखिलेश यांनी रविवारीच राहुल गांधी यांना काँग्रेस पक्षात मोठी जबाबदारी देण्याबाबत तरफदारी केली होती.