सेरेनाने जिंकला अमेरिकन ओपन करंडक

न्यूयॉर्क: आघाडीची महिला टेनिसपटू सेरेना विल्यम्स हिने अटीतटीच्या लढतीत अनुभवाच्या आधारे व्हिक्टोरिया अजारेचा पराभव करीत अमेरिकन ओपन एकेरी महिला चँपियनशिपच्या चषकावर आपले नाव कोरले.

महिला एकेरीच्या अंतिम लढतीत महिला टेनिसपटूंच्या यादीत ४थ्या क्रमांकावर असलेल्या सेरेनाने प्रथम क्रमांकावर असलेल्या व्हिक्टोरियाचा ६-२, २-६, ७-५ असा पराभव केला. अत्यंत चुरशीने खेळला गेलेला हा अंतिम सामना तब्बल २ तास १८ मिनिटे चालला.

यापूर्वी १९९९, २००२ आणि २००८चा महिला एकेरी अमेरिकन ओपन करंडक सेरेनाने जिंकला आहे. एकाच वर्षात विम्बल्डन आणि अमेरिकन ओपन टेनिस जिंकणारी सेरेना ही पहिली महिला टेनिसपटू ठरली आहे.

सामन्यानंतर सेरेनाने खिलाडूपणे व्हिक्टोरियाच्या खेळाची प्रशंसा केली. ‘ व्हिक्टोरियाचा खेळ पाहता मी अमेरिकन ओपन जिंकल्यावर माझा विश्वासच बसत नाही. खरे तर मला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागणार अशी मनाची तयारी मी केली होती;’ असे सेरेनाने स्पष्ट केले.

Leave a Comment