सर्वाधिक चिमण्या पुणे परिसरात

पुणे दि.१० – चिमण्या कुठे हरविल्या याची चर्चा जोरावर असतानाच नवीन ऑनलाईन सर्व्हेक्षणाचे निकाल आता समोर येऊ लागले आहेत. शहरातून चिमण्यानी स्थलांतर केल्याचा अनुभव येऊ लागला असतानाच या नव्या सर्वेक्षणानुसार पुणे शहर आणि परिसरात जंगले, ग्रामीण भाग, खेडी आणि नागरी भागापेक्षा अधिक संख्येने चिमण्या असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे चिऊताई कुठेही हरविलेली नाही असा दिलासा पर्यावरण प्रेमी आणि पक्षीप्रेमींना नक्कीच मिळणार आहे.

सिटीझन स्पॅरो या नावाने केंद्रीय पर्यावरण विभाग, वनविभाग, मुंबई नॅचरल हिस्ट्री सोसायटी तसेच अनेक पर्यावरणवादी संस्थांनी देशभर चिमण्या कुठे कुठे विखुरल्या आहेत याचे सर्वेक्षण सुरू केले होते. पूर्वी ज्या नागरिकांनी चिमण्यांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला होता, त्यातच या हाऊस स्पॅरोंचाही समावेश करून त्याची माहिती गोळा करण्यात येत होती. अनेक राज्यांनी हा उपक्रम राबविला होता तसाच तो महाराष्ट्रातही राबविला जात होता. त्यात पुणे ,मुंबई, नागपूर शहरात सर्वाधिक निरीक्षणे नोंदविण्यात आली. महाराष्ट्रापाठोपाठ तमीळनाडू आणि कर्नाटकात निरीक्षणे नोंदविली गेली.

ऑनलाईन सर्वेचा अहवाल या महिन्यात जाहीर करण्यात येणार असून पुणे शहरात प्रभात रोड, एरंडवणे, मगरपट्टा, हडपसर, ईस्ट स्ट्रीट, बोपोडी, कोथरूड, पाषाण, पेशवे पार्क, दांडेकर पूल, सारसबाग, सिप्ला सेंटर, निलायम थिएटर, पर्वती दर्शन परिसर अशा परिसरात चिमण्याची संख्या चांगलीच असल्याचेही दिसून आले. पूर्वी सदाशिव पेठेसारख्या पेठांतून ही संख्या अधिक होती. मात्र आता या परिसरातील जुने वाडे नष्ट होऊन त्यांची जागा मोठमोठ्या इमारतींनी घेतल्याने चिमण्यांना राहण्यासाठी जागाच शिल्लक राहिलेल्या नाहीत त्यामुळे तेथील संख्या तुलनेने कमी झाल्याचेही मत व्यक्त करण्यात आले आहे. तुलनेने पुणे उपनगरांत बंगले आणि मोठमोठ्या सोसायट्यांमधून अजूनही जमीन शिल्लक आहे. तसेच झाडे झुडपे अधिक संख्येने असल्याने तेथे चिमण्यांचे वास्तव्य आहे असेही दिसून आले आहे.

बाबू काटदरे यांच्या संस्थेतर्फे नागरिकांना पक्ष्यांची १००० कृत्रिम घरटी पुरविण्यात आली आहेत. त्यातील ४० टक्के घरटी चिमण्यांनीच ऑक्युपाय केली आहेत असेही या निरीक्षणांत दिसून आले आहे.

Leave a Comment