शाहरुखच्या गावात जात नाही लाईट

बॉलीवूडचा सुपरस्टार शाहरुख खान हा सर्वच अर्थाने सुपर स्टार आहे. त्याने त्याची प्रचीती नेहमीच सामजिक कार्यात भाग घेऊन दाखवून दिली आहे. शाहरुखने काही दिवसापूर्वी दोन गावे दत्तक घेतली होती. बदायु शहरापासून १९ किलोमीटर अंतरावर असलेल्या फूलपूर व रोली गावात यापूर्वी सतत अंधारच होता. मात्र किंग खानने दत्तक घेतल्यापासून या गावातील लाईट कधीच जात नाही.

शाहरुखने २००९ साली हे दोन गावे दत्तक घेतली होती. त्यावेळी याठिकाणी विजेची सोय नव्हती. त्यामुळे या परिसरातील अन्य गावासारखे नागरिकांना अंधारात रहावे लागत होते. मात्र २०११ साली ‘हुमाना पीपल टू पीपल इंडिया’ या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून प्रत्येक घरामध्ये सोलार लाईटचे वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे हे गाव आता प्रकाशझोतात आले आहे. या गावातील लाईट आता कधीच जात नाही. या सोलर लाईटच्या देखरेखीचे काम गावातील महिला करतात. या गावात वीज आल्याने येथील शिलाई व कढाईचे काम ही आता लाईटच्या माध्यामातून होत असल्याने येथील नागरिक सध्या खूष आहेत.

किंग खानने आता पर्यंत देशातील १८ गावे दत्तक घेतली असून त्याने या गावाच्या सर्व समस्या सोडवून येथील नागरिकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. त्याचा हा आदर्श इंडस्ट्रीमधील त्याच्या इतर सहकार्यांनी घेतला तर भारतातील अनेक गावे स्वयंपूर्ण होतील.