नवी दिल्ली दि.१०- भारतात मोबाईल ग्राहकांची वाढती संख्या ही काही काळापूर्वीची परिस्थिती ऑगस्ट महिन्यात बदलली असून जूनच्या तुलनेत जुलमध्ये ही संख्या तब्बल दोन कोटींपेक्षा अधिक घटली असल्याचे ट्रायच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. जूनमध्ये मोबाईलधारकांची संख्या ९६.५५ कोटी होती ती जुलैत घसरून ९४.४८ कोटींवर आली आहे. विशेष म्हणजे मोबाईल क्रांती आल्यापासून प्रथमच ग्राहकसंख्येत घट नोंदविली गेली आहे.
वास्तविक दूरसंचार क्षेत्रात भारत ही वेगाने विकसित होत असलेली बाजारपेठ असूनही ही घट होण्यामागे ट्रायने आणलेली अधिक कडक नियमप्रणाली जशी कारणीभूत आहे, तसेच टूजी स्पेक्ट्रम वाटप घोटाळ्याचाही हा परिपाक असू शकतो असे या क्षेत्रातील तज्ञांचे मत आहे. रिलायन्स कम्युनिकेशनने सर्वाधिक ग्राहक गमावले असून त्यांनी दोन कोटी ग्राहक गमावले आहेत. त्यापाठोपाठ टाटा टेलिसर्विसेसने २४ लाख, युनिनॉरने १० लाख तर व्हिडीओकॉनने ४१ हजार ग्राहक गमावले आहेत.
रिलायन्स टेलिकॉमच्या मते ट्रायने नवीन कडक नियम केले आहेत. त्यानुसार वापरात नसलेली कनेक्शन बंद करण्याचा आदेश दिला गेला आहे. रिलायन्सने गेल्या दोन महिन्यात अशी वापरात नसलेली अनेक कनेक्शन बंद केल्याने त्यांची ग्राहकसंख्या घटली आहे. नवीन कनेक्शन देताना करण्यात आलेले नियमही ग्राहकसंख्या वाढण्यात अडचणीचे ठरत आहेत असे त्यांचे म्हणणे आहे.
मात्र एकीकडे नामवंत कंपन्यांचे ग्राहक घटत चालले असताना भारती एअरटेलने जुलैत त्यांची ग्राहकसंख्या वाढविली असून जुलैत १५ लाख नवे ग्राहक आकर्षित केले आहेत. आता त्यांची ग्राहकसंख्या १८.८ कोटींवर गेली आहे. तसेच व्होडाफोनची ग्राहकसंख्या १२ लाखांनी वाढून १५.४ कोटींवर गेली असल्याचेही याच आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.