नको रे देवा

बाळासाहेब ठाकरे यांनी म्हटले आहे. माझ्या हातात लष्कर द्या. बघा कसे सर्वांना सरळ करतो. खरे तर बाळासाहेब नेमके काय म्हणत आहेत ते त्यांना तरी कळतेय की नाही हे कळत नाही. आपल्या हातात लष्कर द्यावे अशी मागणी ते कोणाकडे करीत आहेत ? लष्कराचे सर्वाधिकार कोणाच्या तरी हातात देण्याचा अधिकार कोणालाच नाही. लष्कराचे प्रमुख म्हणून राष्ट्रपती काम करीत असतात. पण ते खरे प्रमुख नसतात. त्यानी  लष्कराचे प्रमुख म्हणून कोणत्या कागदावर आणि कधी सही करायची याचा निर्णय मात्र मंत्रिमंडळ घेत असते. आपल्या देशाचा सर्वात मोठा कार्यकारी पदाधिकारी पंतप्रधान असतो. पण, ‘आता बाळासाहेब ठाकरे यांना लष्कराचे सर्वाधिकार देण्यात येत आहेत,’असे पंतप्रधानही जाहीर करू शकत नाहीत. त्यांनाही तशी घोषणा करताना संसदेचा बहुमताचा कौल घ्यावा लागतो. तसा तो घेतला आणि संसदेने बाळासाहेबांना लष्कराचे प्रमुख म्हणून जाहीर केले तरीही ते तसे होत नाहीत कारण संसदेलाही वाट्टेल तो ठराव करण्याचा अधिकार आपल्या घटनेने दिलेला नाही. तो ठराव घटनेला धरून आहे की नाही हे पहावे लागते. म्हणजे आता आपल्या देशात ज्या प्रकारची लोकशाही आहे तिच्यानुसार तरी बाळासाहेबांना कोणी लष्कराची सूत्रे देऊ शकत नाही.
 
आता तशी ती द्यावी असे बाळासाहेबांचे मात्र म्हणणे आहे. मग तसे होणार असेल तर देशातली जनताच ती सूत्रे त्यांना देऊ शकते. पण तीही अशी सुखासुखी नाही. तिने प्रचंड बहुमत द्यावे लागेल. त्यानंतर त्यांना पंतप्रधान होता येईल. मग त्यांच्यामागे पुरेसे बहुमत असेल तर त्यांना घटना बदल करून पंतप्रधानांना लष्कराचा सर्वाधिकार देणारी घटनेतली अडचण दूर करावी लागेल. ती घटना दुरुस्ती सर्वोच्च न्यायालयात मंजूर व्हावी लागेल. तरच ठाकरेंच्या हातात लष्कराची सूत्रे येतील. पण ठाकरे यांना घटना वगैरे काही मान्य दिसत नाही. असो. त्यांचा एक भ्रम आहे की आपल्या हातात लष्कराची सूत्रे आली तर आपल्या लष्कराच्या तिन्ही दलांचे प्रमुख हात जोडून उभे राहतील आणि म्हणतील, ‘सांगा बाळासाहेब, कोणाला गोळ्या घालायच्या आहेत.  आता त्यांना गोळ्या घालतो आणि उडवतो.’ अशी कल्पना त्यांच्या मनात येऊ शकते कारण त्यांना मुळात तर्कशुद्ध विचार करण्याची सवयच नाही. ते अशाच काही तरी थापा ठोकत असतात आणि त्यांच्यासारख्या लोकांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करीत असतात.
       
ज्या माणसाला आपल्या राज्यात, आपल्या शहरात आणि आपल्या राज्यातही स्पष्ट बहुमत मिळवता येत नाही. तो माणूस या देशातल्या लष्कराची सूत्रे हाती यावीत अशी मागणी करतोय ही गोष्टच मुळात हास्यास्पद आणि या जनतेचा अपमान करणारी आहे. कारण त्यांना जनतेत काहीही स्थान नाही. त्यांनी महाराष्ट्रातली सत्ता एकदा मिळवली होती पण ती दोन भावनात्मक मुद्यांवर मिळवली होती. पहिला होता तो मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा  आणि दुसरा होता तो बाबरी मशिदीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या जातीय दंगलींचा. हे दोन मुद्दे एकदम उभे राहिले आणि त्या पार्श्वभूमीवर बाळासाहेबांना सत्ता मिळाली पण तीही संपूर्ण मिळाली नाही. भाजपाच्या साहयाने मिळाली. भाजपाचा सहयोग असतानाही त्यांना स्पष्ट बहुमत मिळाले नाही. त्या दोन मुद्यांची हवा ओसरल्यावर त्यांना पुन्हा अशी अर्धीमुर्धी सत्ताही मिळवता आली नाही. त्यांच्या हातात लष्कराची सत्ता असावी असे ते म्हणत असतात पण त्यांना एकदा महाराष्ट्राच्या पोलिसांची सूत्रे मिळाली होती. तीही त्यांना नीट हाताळता आली नाहीत. असा माणूस लष्कराची सूत्रे हातात घेऊन काय करणार आहे ?

भारत  आणि पाकिस्तान यांच्या सबंधांचा काही मुद्दा समोर आला की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे  बाहया सरसावतात.  भारतात पाकिस्तानचे गायक आणलेले चालणार नाहीत. भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेटचे सामनेही झालेले चालणार नाहीत. तसे ते झाले तर सामन्यांत गोंधळ घालू, मैदानात साप सोडू किवा खेळपट्टी खोदू अशा धमक्या बाळासाहेब द्यायला लागतात.  कधी काळी शिवसेना केन्द्रातही सत्तेवर होती.  पण त्यांच्या काळात पाकिस्तानने संसदेवर हल्ला केला तरीही  वाजपेयी सरकारने पाकिस्तानला धडा शिकवला नाही. उलट ते न बोलावता लाहोर यात्रेवर गेले. त्यावेळी पाकिस्तानचे खेळाडू भारतात आले, खेळले आणि भारतीय खेळाडू पाकिस्तानात गेले आणि तिथे खेळले. त्या वेळी बाळासाहेबांनी या प्रखर राष्ट्रप्रेमाच्या मुद्यावर सरकारचा पाठिबा काढून घ्यायला हवा होता. एकेकाळी हातात सत्ता असताना त्यांनी काहीच केले नाही. महाराष्ट्रात हाती सत्ता येण्याच्या आधी ते असेच म्हणत असत. माझ्या हाती महाराष्ट्र द्या, कसे सर्वांना सरळ करतो बघा. मग त्यांच्या हातात महाराष्ट्र आला पण बाळासाहेब कोणालाही सरळ करू शकले नाहीत. त्यांच्या पुतण्यालाही ते सरळ करू शकले नाहीत. 

Leave a Comment