लढावू वैमानिकांसाठी टॉप गन एक्सरे हेल्मेट

लंडन दि.११ – लढावू वैमानिकांना विमानाच्या भिंतीतूनही बाहेरचे दिसू शकेल असे हेल्मेट युकेतील कंपनीने तयार केले असून याचा वापर स्ट्रायकर हेल्मेट म्हणूनही होऊ शकणार आहे. इतकेच नव्हे तर एखादे लक्ष्य वैमानिकाने हेरले असेल तर ड्रोन विमानांनाही त्यासंबंधीची सूचना देऊन त्या लक्ष्यावर अचूक भेद करणे वैमानिकांना शक्य होणार आहे.

या टॉप गन एकस रे हेल्मेटवर अनेक सेन्सर बसविण्यात आले असून ते विमानावर बसविलेल्या असंख्य कॅमेर्‍यांशी इंटरअॅक्ट करू शकतात. यामुळे पायलट नक्की कुठे पाहतो आहे त्याचे विमान कॅमेर्‍यांशी मॅचिंग झाले तर विमानाबाहेरचेही पाहणे पायलटना शक्य होणार आहे. एखादे टार्गेट जमिनीवर दिसले की पायलटने फक्त त्या दिशेने डोके वळवायचे आणि हेल्मेटवरचे बटण दाबायचे की ती वस्तू काय आहे याचे ज्ञान पायलटला होईल.तसेच एखादे टार्गेट साधायचे असेल तर पायलटने याच हेल्मेटचा वापर करून तशी माहिती ड्रोन या मानवरहित विमानांना तंत्रज्ञानाच्या उपयोगाने पाहोचविली की ड्रोन लक्ष्याचा अचूक वेध घेऊ शकणार आहे असे या डिफेन्स कंपनीचे उपाध्यक्ष पीटर रॉबी यांचे म्हणणे आहे.

या हेल्मेटचा वापर नाईट व्हिजन गॉगल्ससहही करता येणार आहे. पायलट या हेल्मेटमुळे जसे विमानाबाहेरचे पाहू शकणार आहे तसेच त्याला आजूबाजूच्या न दिसणार्‍या परिसरातील आवाज एकू यावेत यासाठी हीच कंपनी थ्रीडी ऑडिओ सिस्टीमही विकसित करत आहे असे सांगण्यात आले आहे.