मी मांडवलीचे धंदे करत नाही-राज ठाकरे

’सूरक्षेत्र’वरली बंदी मागे घेतल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर विरोधकांकडून मांडवली केली जात असल्याचे आरोप झाले. त्याला त्यांनी ठाण्यातील एक कार्यक्रमात चोख प्रत्युत्तर दिले.मांडवलीचे धंदे मी करत नाही, असे म्हणत राज म्हणाले, ’सूरक्षेत्र या कार्यक्रमाचे निर्माते बोनी कपूर माझ्याकडे आले आणि त्यांनी त्यांची व्यथा मला सांगितली. त्यानंतर आता काय करावे असा प्रश्न मला पडला. त्यांची आर्थिक परिस्थिती सध्या चांगली नाही. त्या कार्यक्रमात गाणारे जरी पाकिस्तानी असतील तरी, तो कार्यक्रम आपल्याच देशातील लोकांचा आहे. हा विचार करुन त्यांना जनतेची माफी मागा असे सांगून यापुढे असे करु नका असेही बजावल्याचे ते म्हणाले.

मी राजकारणात नसतो तर, चित्रपट निर्मीती क्षेत्रात असतो असे सांगत त्यांनी साजिद नाडियदवाला या हिंदी व्यावसायिक निर्मात्याचे उदाहरण दिले. ’सिनेमात प्रयोग करा. पण, हे प्रयोग करण्यासाठी आधी सिनेमातून पैसे कमवा. एकदा पैसे मिळाले की सिनेमात हवे ते प्रयोग करा, चित्रपट निर्मीती हे माझे सर्वाधिक आवडीचे क्षेत्र आहे. मराठी चित्रपट अधिक दर्जेदार असला पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

ते म्हणाले, माझी आई आणि पत्नीकडून मला कळते की, हिंदी चॅनल्सपेक्षा मराठी मालिका अधिक दर्जेदार आणि चांगल्या असतात. त्यामुळे घरबसल्या लोकांना चांगले कार्यक्रम पाहायला मिळत असताना त्यांना चित्रपटगृहापर्यंत आणणे हे या उद्योगासमोरचे आव्हान आहे. त्याचा विचार करुन चित्रपट निर्मीती केली पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला.

Leave a Comment