महाराष्ट्रात रस्ते मार्गाने गुटख्याची तस्करी

पुणे दि. ९- महाराष्ट्र शासनाने २० जुलैला राज्यात गुटखा, उत्पादन, साठवण आणि विक्रीवर बंदी घातली असूनही राज्याच्या विविध सात विभागात गेल्या कांही दिवसांत तब्बल ६ कोटी रूपयांचा गुटखा छापे घालून जप्त करण्यात आला आहे. पुणे, मुंबई, ठाणे, अमरावती, नागपूर, औरंगाबाद आणि नाशिक अशा विभागांचा यात समावेश आहे. पैकी ५० टक्के गुटखा ठाणे विभागातून जप्त करण्यात आला आहे.

याविषयी अधिक माहिती देताना अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त महेश झगडे म्हणाले की आम्ही राज्यातील ११ महामार्ग निश्चित केले आहेत. यामार्गांचा वापर करून गुटखा आणि पानमसाला अन्य राज्यातून महाराष्ट्रात तस्करी करून आणला जात आहे असे दिसून आले आहे. गुजराथ, आंध्र, कर्नाटक या शेजारी राज्यातून तसेच उत्तर प्रदेशातून ही तस्करी होत आहे. अन्न आणि औषध प्रशासनाने या मार्गांवर अधिक लक्ष केंद्रीत केले आहे आणि त्यासाठी वाहतूक विभाग आणि पोलिसांकडील माहितीचाही वापर केला जात आहे. रस्त्यांप्रमाणेच कांही रेल्वे मार्गावरूनही गुटख्याची तस्करी राज्यात होत असल्याचे आढळले आहे. देशातील गुजराथ सह ११ राज्यात गुटखा उत्पादन व विक्रीला बंदी आहे. मात्र आंध्र आणि कर्नाटक ही राज्ये देशातील सर्वाधिक तंबाखू उत्पादक राज्ये असून येथे तंबाखूजन्य पदार्थ उत्पादनाला बंदी नाही.

झगडे पुढे म्हणाले की संबंधित राज्यातील अन्न औषध प्रशासन आयुक्ताशी आम्ही संपर्कात आहोत. त्यांनाही गुटखा व पानमसालाच्या तस्करीवर बारीक लक्ष ठेवण्याची विनंती करण्यात आली आहे. एकट्या मुंबईतच १ हजारपेक्षा अधिक टपर्‍यांवर हे पदार्थ विकले जातात. अन्न औषध प्रशासनाकडे त्या तुलनेत तपासणी इन्स्पेक्टर कमी असल्याने सतत लक्ष ठेवणे हे अवघड काम आहे.

Leave a Comment