दुष्काळ हटवण्यासाठी उपाययोजनाची गरज

water2सरकारने राज्यातील १२३ तालुके दुष्काळग्रस्त असल्याचे नुकतेच जाहीर केले आहेत. मात्र हे जाहीर करीत असताना ही परिस्थिती कशा प्रकारे टाळता येऊ शकते याबाबत कोणत्याच उपाययोजना सुचविल्या नाहीत. एकंदरीत गेल्या १० वर्षातील राज्यातील पावसाची परिस्थीती पाहता तीनदा दुष्काळाचे संकट ओढावले आहे. ही परिस्थीती भविष्यात ओढावू नये म्हणून यासाठी ठोस उपाययोजनाची गरज आहे.

वास्तविक पाहता राज्यातील स्थिती गंभीर असले तर सरकारकडून १५ सप्टेंबरनंतर दुष्काळसदृश परिस्थीती अथवा दुष्काळ जाहीर केला जातो; परंतु यावर्षी भर पावसाळ्यातच म्हणजेच ऑगस्ट महिन्यात दुष्काळ जाहीर करावा लागत आहे. अशा स्वरुपाची वेळ बहुधा पाहिल्यांदा आली असावी. काही दिवसापासून राज्यातील काही भागात पावसाने दडी मारल्याने स्थिती गंभीर बनली आहे.

पावसाअभावी खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला आहे. ग्रामीण भागातील काही गावांना मार्च महिन्यापासून सुरु झालेला टँकरद्वारे पाणीपुरवठा सप्टेंबर महिना आला तरी करावा लागत आहे. टंचाई परिस्थितीती लक्षात घेऊन सर्वत्र टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे जनावरासाठी चारा डेपोमध्ये चारा उपलब्ध करून देण्यात आला असला तरी या दिल्या जात असलेल्या सर्व सोयी सुविधा अपुऱ्या आहेत. सप्टेंबर महिन्याच्या सुरवातीला झालेल्या थोड्या फार पावसाने मराठवाड्यातील औरंगाबाद, परभणी, हिंगोली व लातूर या जिल्ह्यात दुष्काळाचे थोडेसे चित्र बदलले असले तरी काही गावांना अजूनही टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे.

राज्यात पावसाच्या प्रमाणानुसार दोन भाग पडतात. एक म्हणजे जादा पावसाचा भाग तर दुसरा कमी पावसाचा भाग. एकीकडे ५०% पेक्षा जास्त पाऊस पडतो. त्यावेळी दुसऱ्या भागात मात्र अजून पाऊस पोहचलेला नसतो. त्यामुळे काही भागात पाऊस तर काही भागात दुष्काळ अशी विचित्र परिस्थीती निर्माण होत आहे. त्यामुळे आगामी काळात ही स्थिती राज्यात निर्माण होऊ नये यासाठी ठोस उपाय योजनाची गरज आहे.

पाण्याचा थेंब ना थेंब वाचला पाहिजे. यासाठी सर्वस्थरातून प्रयत्न आवश्यक आहेत. त्यासाठी जलसंधारणवर सुद्धा भर देण्याची आवश्यकता आहे. पावसाचे पाणी अडविले पाहिजे. काही ठिकाणी हे पाणी पाझर तलाव, धरण, बंधारे घालून अडविण्यात आले आहे. मात्र गेल्या काही दिवसापासून पाऊसच पडला नसल्याने त्याची निर्मिती करूनही पाणी अडलेले नाही. त्यामुळे हे सर्व प्रकल्प पावसाअभावी कोरडे ठाक पडले आहेत.

पाण्यासाठी काही ठिकाणी जुने स्तोत्र असलेल्या विहीर व विंधन विहीर यांचा वापर केला जात आहे. गेल्या काही दिवसापासून हे स्तोत्र देखील पाण्याभावी आटून गेले आहेत. त्यामुळे भविष्यत दुष्काळ हटवण्यासाठी आता पासूनच नियोजन केले तरच दुष्काळ टाळता येईल. त्यासाठी जागो जागी नदी अडून त्यावर सिमेंट काँक्रीटचे बंधारे घालावेत. त्यामुळे भूजल पातळीवर येण्यास मदत होणार आहे त्याशिवाय परिसरातील शेतीला ही पाणी मिळेल. राज्यात नदी जोड प्रकल्प राबवावा. धरणापासून पाणी नसलेल्या भागात कालवे काढण्याची गरज आहे. त्याशिवाय या योजना सुरु करीत असताना त्यातील भ्रष्टाचार कमी करावा. आता दुष्काळासाठी सरकारी पॅकेज येईल ते पळविण्यासाठी राजकर्त्याची कुरघोडी सुरु होईल. हे प्रकार टाळयला हवेत. चारा डेपोचे अनुदान किंवा इतर दुष्काळी अनुदान बँक खात्यात जमा करावे म्हणजे जेणेकरून भ्रष्टाचार कमी होईल.

Leave a Comment