देवगिरी – दौलताबाद

महाराष्ट्रातील औरंगाबाद या शहरापासून अवघ्या १३ किमीवर असलेल्या दौलताबाद किल्ल्याची भेट खर्‍या अर्थाने संस्मरणीय ठरते याचा अनुभव प्रत्यक्ष देवगिरीला म्हणजेच दौलताबादला गेल्याशिवाय कसा येणार ? पावसाळा अजून संपला नाहीये. तोपर्यंतच सुट्टीची तजवीज करा आणि पावसाळा संपताच निघा देवगिरीला.

औरंगाबाद सोडून दौलताबादकडे निघालात की दूरूनच उंच मिनार आपले लक्ष वेधून घेतो. बाहेरून अतिशय आकर्षक आणि आतून आश्चर्यचकीत करणारा पिरॅमडच्या आकाराचा टेकडीवर वसलेला हा किल्ला मध्ययुगीन काळातला आहे हे आज पाहून पटणार नाही. जगात जे कांही हाताच्या बोटावर मोजण्याइतके किल्ले चांगले जतन केले आहेत त्यात या किल्लयाचा समावेश होतो. या अजिंक्य गडावर अनेक राजांनी राज्य केले आणि याचे वैशिष्ठ्य म्हणजे सैनिकांच्या बळावर अथवा युद्ध सामग्रीच्या बळावर हा किल्ला कधीच कुणाला जिंकता आला नाही. प्रत्येकवेळी तो जिंकला गेला तो फितुरीने, विश्वासघाताने आणि रक्तपाताने. आजही या किल्ल्यावर राज्य केलेल्या बलशाली राजांच्या अनेक कथा तो सांगतोच आहे. यादव राजांची राजधानी असलेला हा किल्ला दौलताबादचा राजा भिल्लमराजा याने बांधला असे इतिहास सांगतो. ११८७ साली त्याचे नामकरण देवगिरी असे केले गेले. पन्नास हजार सैन्याचा पराभव अवघा दोन हजार सैनिकांनी करण्याचा इतिहास इथे अनेकवेळा लिहिला गेला.

किल्याची रचना अतिशय वैशिष्ठपूर्ण म्हणावी अशीच. बळकट आणि अभेद्य भितींच्या अनेक पातळ्या आणि हत्तीही फोडू शकणार नाहीत असे बेलगाम दरवाजे यांनी परिपूर्ण असा हा किल्ला शत्रूला पराक्रमाने जिंकणे कधीच शक्य झाले नसते हे आजही हा किल्ला पाहिल्यावर आपल्याला पटते. समजा शत्रू पहिल्या भिंती आणि दरवाजे तोडून आत घुसलाच तर पुढे चाळीस फूटी खंदक. पाण्याने भरलेला. शिवाय पाण्यात सुसरी मगरी. खंदक ओलांडून यायला एकच पूल तो शत्रू आला की उचलून घेतला जायचा. शिवाय पूल उचलायला समजा वेळ मिळाला नाही तर पुलावरून येणार्‍या सैनिकांचे स्वागत व्हायचे किल्ल्याच्या बुरूजांवर लपलेल्या सैनिकांच्या विषारी बाणांनी. त्यातूनच शत्रू पुढे आलाच तर तो येणार निमुळत्या अरूंद पॅसेजमध्ये. एकावेळी दोन जण जाऊ शकणार नाहीत इतक्या अरूंद या वाटा. शिवाय कुठली वाट कुठे जाते याचा पत्ता लागणे अशक्यच. कारण इथे नुसता वाटांचा भुलभुलैय्या. म्हणजे माणूस परत फिरून पहिल्याच जागी येणार. आजही हा भुलभुलैय्या आपल्याला सहज गोंधळात पाडायला समर्थ आहे.

शत्रू फारच हुषार असला आणि या भुलभुलैय्यातून सुटला तर ज्या वाटेवर येणार तेथे विष लावलेले काटे पसरलेले. त्यात अंधार. रस्ता दिसावा म्हणून मशाल पेटवावी तर शत्रूच सैनिकांना दिसणार आणि ते ऐतेच त्याला टिपणार. बरं मशाली विझवाव्या तर शत्रूचेच सैनिक रस्ता चुकून एकमेकांसमोर येणार आणि आपल्याच सैनिकांना मारणार. इतके कमी की काय म्हणून बोळाच्या तोंडाला उजेड दिसतोय असे वाटून शत्रू पुढे वाट सापडेल म्हणून जाणार तर तिथे उकळते तेल शत्रू सैनिकांच्या अंगावर. तिथले रस्ते इतके निसरडे की पुन्हा आपले खंदकात पडायला होणार. शिवाय सल्फरच्या विषारी धुराचा प्रसाद मिळणार तो वेगळाच. त्यातूनही बचावलात आणि किल्यात घुसलात की आधीच जराजर्रर झालेल्या शत्रू सैनिकांशी लढायला ताज्या दमाची राजाच्या सैनिकांची तुकडी तयार. मग आता सांगा हा किल्ला कसा जिंकला जाणार?

अर्थात फंदफितुरीचा शापच हा किल्ला जिंकायला उपयोगी पडायचा. १२९४ मध्ये अल्लाऊद्दीन खिलजीने अशीच आक्रमणाची हूल उठवून आणि फसवणूक करून राजा रामदेवरायाकडून हा किल्ला जिकून घेतला. तो आला होता राजाचा सन्मान करायचा बहाणा करून. त्याचा सरदार मलिकाफूरने तर राजाच्या जावयाला, हरपालला जिवंत सोलून वेशीवर उलटे टांगले होते असे इतिहास सांगतो. दहशत बसवायचाच हा एक प्रकार.

वेडा महम्मद म्हणून ज्याचा इतिहासात उल्लेख केला जातो त्या महम्मद तुघलखने आपली राजधानी दिल्लीहून दौलताबादला आणण्याचा वेडेपणा केला होता. इतके दूरचे अंतर कापताना अनेक महिला, मुले, वृद्ध रस्त्यातच मरण पावले. याच तुघलखाने देवगिरीचे दौलताबाद केले. मात्र येथे पाणी पुरेसे नाही असे लक्षात येताच तो पुन्हा दिल्लीला चालता झाला.  त्यानंतर बहामनी, मुघल, निजाम अशा अनेक राजघराण्यांनी किल्ल्यावर राज्य केले.सर्वात उल्लेखनीय ठरला तो मलिक अंबर. हा हबशी निजामाचा गुलाम होता पण आपल्या कर्तृत्त्वावर तो मंत्री झाला आणि नंतर त्याने स्वतःला राजा घोषित केले. हा इतिहास आहे १७ व्या शतकातला. यानेच खडकी नावाने किल्ल्याजवळ शहर उभारले. नंतर याच खडकीचे औरंगजेबाने औरंगाबाद केले.
 
देवगिरीवर जातानाच डोगराच्या मध्यावर आहे ३० मीटर उंचीचा चांदमिनार. शत्रूवर नजर ठेवण्यासाठीचा हा वॉचटॉवर. हा पुष्कळ नंतर बांधला गेला असे सांगतात. किल्ल्यात आत प्रचंड मोठा दगडी हौद आहे. शत्रूसैन्याचा वेढा पडलाच तर हा हौद पाण्याची गरज पुरी करत असे. शिवाय अनेक तोफा आहेत त्यातील पंचधातूची व १२ किमीचा मारा करू शकणारी मेधा तोफ आवर्जून पाहावी. वर टेकडीवर महाल असून बारादारी असे त्याचे नांव आहे. म्हणजे बारा दरवाजे असलेला महाल. त्या काळच्या  करमणुकीसाठी म्हणजे नृत्य, संगीतसभांसाठी मोठा हॉल आणि आजूबाजूचे सुंदर दृष्य न्याहाळण्यासाठी असलेले सुंदर सज्जे या महालाची शोभा अजून वाढवितात.

किल्ला चढून जायचा म्हणजे थोडे कष्टाचे काम आहे खरे. पण इतिहासाची अनुभूती घ्यायची तर एवढे कष्ट कांही जास्त नाहीत. किल्ल्यावर जाताना मार्गदर्शक जरूर घ्यावा त्यामुळे किल्याविषयी सांगितल्या जाणार्‍या अनेक अदभूत कथांचा आनंद घेता येतो आणि किल्ल्याची ही अवघड चढण अधिक सोपी वाटू लागते. मग कधी निघताय दौलताबादला?