सीएसटी हिंसाचाराचा मास्टरमाईंड दाउद इब्राहीम

मुंबई: सीएसटी हिंसाचार प्रकरणात कुख्यात आंतरराष्ट्रीय डॉन दाउद इब्राहीम याचा सहभाग असल्याचे केंद्रीय तपास यंत्रणांना आंतरराष्ट्रीय दूरध्वनी संभाषणाच्या विश्लेषणावरून आढळून आले आहे. राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील आणि या हिंसाचाराची चौकशी करणार्या मुंबई पोलिसांना गुप्तचर विभागाने याबाबत माहिती दिली आहे.

रझा अकादमीने आसाम हिंसाचाराच्या विरोधात काढलेल्या मोर्चाला आझाद मैदान, सीएसटी परिसरात हिंसाचार उफाळून आला. या हिंसाचारात पोलीस, पत्रकारांना मारहाण आणि महिला पोलिसांचा विनयभंग करण्यापर्यंत दंगेखोरांची मजल गेली. हा हिंसाचार पूर्वनियोजित असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या इंसाचारामुळे मुंबई पोलीस आयुक्तांना आपले पद सोडावे लागले.

या हिंसाचारामागे विदेशातून भारत विरोधी कारवाया करणाऱ्या दाउद टोळीचा हात असल्याचे निष्पन्न झाले आहे. हा हिंसाचार होण्यापूर्वी दोन दिवस पाकिस्तानच्या विविध भागातून चिथावणी देणारे दूरध्वनी करण्यात आले. या दूरध्वनीने मोर्चापूर्वी वातावरण तापविण्यात आले आणि त्याचा परिणाम म्हणून या मोर्चात हिंसाचार भडकला; असा गुप्तचर यंत्रणांचा दावा आहे. अशा प्रकारे पाकिस्तानातून दूरध्वनी आलेल्या अनेकांना पोलिसांनी दंग्यातील सहभागाबद्दल यापूर्वीच अटक केली आहे.

या हिंसाचाराचे पूर्ण नियोजन पाकिस्तानातूनच केल्याचा दावाही गुप्तचर विभागाने केला आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही या हिंसाचारात परकीय शक्तींचा हात असल्याची शक्यता वर्तविली होती.

Leave a Comment