दक्षिण भारतातील शिवकाशी हे गाव आणि त्याचा परिसर हा तीन उद्योगांसाठी प्रसिद्ध आहे. एक उद्योग म्हणजे फटाक्यांचा, दुसरा छपाईचा आणि तिसरा आगपेट्या तयार करण्याचा. देशातल्या फटाक्यांच्या एकंदर उत्पादनापैकी ९० टक्के उत्पादन या गावाच्या परिसरात होत असते आणि आगपेट्यांपैकी ८० टक्के आगपेट्या याच भागात तयार केल्या जातात. या दोन्ही उद्योगांमध्ये येथे हजारो कामगार काम करत असतात. फटाक्यांच्या कारखान्यांजवळच आगपेट्यांचाही कारखाना असावा हा किती दुर्दैवी योगायोग आहे? कारण फटाके तयार केले परंतु आगपेटी नीट वापरली नाही तर याच फटाक्यांचा स्फोट होऊ शकतो आणि नेमके तसेच झालेले आहे. हजारो कामगारांना उपजीविकेचे साधन पुरवणार्या या उद्योगांमध्ये अनेक प्रकारची स्फोटके वापरली जात असतात. परंतु असा स्फोटक उद्योग करताना जी पथ्ये पाळायला हवीत ती नीट पाळली गेली नाहीत म्हणून तिथे अधूनमधून अग्नीप्रलय होत असतो. त्यात अनेक कामगार मरण पावतात आणि अनेक लोक भाजून जखमी होऊन निकामी होतात. त्यांची कुटुंबे उघड्यावर येतात.
याच परिसरामध्ये एका फटाक्याच्या कारखान्यात स्फोटक रसायनाने पेट घेतला आणि पूर्ण फॅक्टरी जळून ५४ लोक मरण पावले. या कारखान्यात हा प्रकार घडला तेव्हा तिथे ३०० लोक काम करत होते. सुदैवाने जवळपास २०० लोक सहीसलामत बाहेर पडू शकले. परंतु रासायनिक पदार्थांचा साठा करण्याच्या बाबतीत ज्या सुरक्षिततेच्या उपाय योजना करायला हव्या होत्या त्या तिथे करण्यात आलेल्या नव्हत्या. त्यामुळे हा प्रकार घडला. शिवकाशीच्या परिसरात फटाके तयार करण्याचा उद्योग अनेक वर्षांपासून सुरू आहे आणि या उद्योगासाठी लागणारा कच्चा माल, तयार करण्याचे कौशल्य, त्याचबरोबर विक्रीची यंत्रणा या सार्या गोष्टींचे जाळे व्यवस्थित विणले गेल्यामुळे तिथे हाच व्यवसाय वरचेवर वाढत चाललेला आहे. तूर्तास तरी तिथे ७०० कारखाने असून त्यांची वर्षाची उलाढाल जवळपास दोन हजार कोटी रुपयांची आहे. या कारखान्यांमध्ये काही कारखाने मोठे आहेत आणि काही मध्यम तर काही अतीशय छोटे आहेत. यातले बरेच व्यावसायिक आपल्या उलाढालीची माहिती शासनाला कळवत नाहीत. त्यामुळे ही उलाढाल दोन हजार कोटी रुपयांपेक्षाही जास्त असावी असा अंदाज आहे.
या उद्योगात दरसाल १० टक्के वाढ होत आहे. परंतु त्या मानाने आवश्यक तेवढे कामगार मिळत नाहीत म्हणून परराज्यातून कामगार आणावे लागतात. असे कामगार आयात करावे लागले की ते साधारणतः बिहार-मधूनच येणार असे आपण गृहितच धरतो. परंतु शिवकाशीची वस्तुस्थिती वेगळीच आहे. तिथे परराज्यातून आलेल्या कामगारांमध्ये बंगालमधून आलेल्या कामगारांची संख्या मोठी आहे आणि मालाला मागणी असताना सुद्धा कामगारांच्याअभावी माल तयार होत नाही हे जेव्हा लक्षात येते तेव्हा तिथले फटाके उत्पादक लहान मुलांना सुद्धा कामाला लावतात. या मुलांसोबत कसलेही प्रशिक्षण नसलेले मोठे लोकही काम करत असतात. दिवाळी जवळ आली की, या लोकांची फार घाई होते आणि ते रात्रंदिवस काम करून, घिसाडघाईने काम करून कसेबसे फटाके तयार करायला लागतात. हे करताना साहजिकच त्यांचे सुरक्षिततेच्या उपायांकडे दुर्लक्ष होते आणि त्यातून असे भीषण अपघात होतात. गेल्या बारा वर्षांमध्ये शिवकाशी परिसरात असे ८८ अपघात झाले असून त्यात आजवर २३७ लोक जीवास मुकले आहेत. एखाद्या प्रकारचा अपघात ८८ वेळा होतो, त्यामागची कारणे सारखीच असतात. परंतु ८८ वेळा अपघात होऊन २३७ लोक मरून सुद्धा असा अपघात पुन्हा कधीच होता कामा नये अशी कसलीच दक्षता आपण घेत नाही हे आपल्या शासन यंत्रणेचे अपयश आहे.
तसा विचार केला तर गेल्या काही वर्षांमध्ये शिवकाशीच्या या उद्योगात सरकारने आपल्या परीने काही नियम कडक केलेले आहेत, असे शासकीय अधिकार्यांचे म्हणणे आहे आणि त्यात बर्यापैकी तथ्य आहे. परंतु त्यामध्ये दोन अडचणी येत असतात. पहिली म्हणजे मुळात या कडक नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी लागणारा आवश्यक तेवढा कर्मचारीवर्ग उपलब्ध नसतो. ७०० कारखाने आणि जवळपास ४० हजार लोकांना रोजगार पुरवणार्या अशा उद्योगांमध्ये हे नियम कडकपणे पाळले जात आहेत की नाही हे पाहण्याकरिता निदान चार-पाचशे तरी कर्मचारी सरकारने नेमले पाहिजेत. परंतु एवढा मोठा व्याप असलेल्या या उद्योगासाठी सरकारकडे जेमतेम १०० सुद्धा कर्मचारी नाहीत. त्याशिवाय हे कर्मचारी सुद्धा मोठ्या कारखान्यांवर लक्ष ठेवतात. लहान आणि मध्यम कारखान्यांकडे त्यांचे दुलर्क्ष होते आणि नेमके अशा लहान कारखान्यातच अधिक अपघात होतात. भिवंडी, मालेगाव अशा शहरांमध्ये अशाच पद्धतीने सरकारच्या नियंत्रणाच्या बाहेर यंत्रमाग व्यवसाय केला जात असतो. तसाच प्रकार शिवकाशीमध्ये सुरू आहे.