राज ठाकरें यांचे ‘लक्ष्य’ पुणे

पुणे दि.७ – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गेल्या कांही दिवसांत वाढलेल्या पुणे भेटींनी अनेक तर्कविर्तक राजकीय वर्तुळात लढविले जात असून आगामी २०१४ च्या विधानसभा निवडणुकात पक्षाची स्थिती पुण्यात अधिक मजबूत करण्यासाठीचे हे प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे. गेल्या दोन आठवड्यात तब्बल पाच दिवस राज यांचा मुक्काम पुण्यात होता असे समजते. कांही मनसे नेते राज वैयकितक कामासाठी पुण्यात आले होते असे सांगत असले तरी या काळात पक्षाच्या पुढील धोरणाबद्दल आणि पक्ष वाढीसाठी करावयाच्या उपाययोजनांबद्दलही प्रदीर्घ चर्चा ठाकरे यांनी कार्यकर्ते आणि शहर नेत्यांशी केली आहे असे खात्रीलायक वृत्त आहे.

मनसेचे शहर युनिट उपाध्यक्ष अजय शिदे यासंदर्भात बोलताना म्हणाले की पुणे महापालिका निवडणुकांत आमच्या पक्षाला चांगले यश मिळाले आहे. इतकेच नव्हे तर नाशिकनंतर पुण्यातच दोन नंबरच्या जागा आम्हाला मिळाल्या आहेत. त्यामुळे राज साहेबांच्या पुण्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. आगामी निवडणुकांच्या दृष्टीने ठाकरे साहेबांनी पुण्याला अधिक महत्त्व देण्याचे ठरविले आहे.शहरात पक्षाची ताकद कशी वाढवायची याविषयी अनेकांशी चर्चा आणि सल्लामसलत केली जात आहे. गेल्या आठवड्यात राज ठाकरे दोन दिवस तर आत्ताच्या आठवड्यात तीन दिवस पुण्यात होते.

राजकीय निरीक्षक प्रकाश पवार यांनीही राज यांच्या पुणे भेटीमागे आगामी विधानसभा निवडणुक हे कारण असल्याचे मत व्यक्त केले आहे. पण त्याचबरोबर राज यांची नजर मराठवाड्यावरही आहे. पुण्यात महापालिका निवडणुकात अनपेक्षित यश मिळाल्यानंतर येथील नेत्यांचे अनुभव लक्षात घेऊन त्यावरूच मराठवाड्याचा निर्णय केला जाईल. सध्या मराठवाड्यात विलासराव देशमुखांच्या मृत्यूमुळे खंबीर नेतृत्त्वच उरलेले नाही. मात्र एकदम मराठवाड्यात घुसण्याऐवजी राज ठाकरे पहिल्यांदा तेथे आपला बेस उभा करतील असाही अंदाज पवार यांनी वर्तविला आहे.विधानसभा निवडणुकात पुणे आणि पुण्यात नव्याने समाविष्ट झालेल्या गावांवर त्यांची नजर असून अधिकाधिक जागा मिळविण्यासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करतील आणि पुणे भेटी हा त्याचाच एक भाग असल्याचेही ते म्हणाले.

Leave a Comment