बिहारमध्ये ठाकरेंवर अनेक याचिका दाखल

पाटणा: बिहारी स्थलांतरितांना घुसखोर म्हणून संबोधल्याबद्दल आणि त्यांच्या विरोधात प्रक्षोभक वक्तव्य केल्याबद्दल शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनाध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुजफ्फरपूर न्यायालयाने जिल्हा पोलिसांना दिले आहेत.

मुंबई पोलिसांनी बिहारमध्ये येऊन आरोपींना अटक केल्यास अपहरणाचे गुन्हे दाखल करण्याचा इशारा बिहारच्या मुख्य सचिवांनी महाराष्ट्र शासनाला दिला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून पोलिसांवर असे गुन्हे दाखल झाल्यास प्रत्येक बिहारी स्थलांतरिताला घुसखोर समजून महाराष्ट्रातून हाकलून देण्याचा इशारा राज यांनी दिला. उद्धव ठाकरे यांनीही बिहारींना महाराष्ट्रात येण्यासाठी परवाना लागू करावा; असे वक्तव्य केले होते.

ठाकरे बंधूंची ही वक्तव्य भावना भडकाविणारी आणि देशात कुठेही जाऊन स्थायिक होण्याच्या घटनात्मक अधिकारावर गदा आणणारी असल्याचा आरोप करून एका वकिलाने या दोघांविरोधात मुजफ्फरपूर न्यायालयात याचिका दाखल केली. ही याचिका दाखल करून घेताना न्यायालयाने राज आणि उद्धव यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले.

अशाचप्रकारे गोपालगंज, पश्चिम चंपारण्य, भागलपूर आणि नालंदा न्यायालयातही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासह राज आणि उद्धव यांच्या विरोधात याचिका दाखल झाल्या आहेत.

Leave a Comment