पाक अणुप्रकल्पांना तालिबानचा धोका

लाहोर दि.७- पाकिस्तानातील सर्व महत्त्वाची केंद्रे आणि अणुप्रकल्पांची सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. गुप्तचर संस्थांकडून पाकिस्तानी अणुप्रकल्पांवर तालिबानी हल्ले होण्याची सूचना दिली गेल्यानंतर हे पाऊल उचलले गेले आहे. देशातील प्रमुख देरा गाझीखान येथील अणुप्रकल्पावर लष्कर आणि पोलिसांचा भलामोठा ताफा तैनात करण्यात आला आहे.

पाकिस्तानातील कामरा लष्करी विमानतळावर दहशतवाद्यांनी मे मध्येहल्ला चढविला होता.गुरूवारी साजर्‍या करण्यात आलेल्या संरक्षण दिनादिवशीही या बेसवर कडक सुरक्षा ठेवण्यात आली होती असे पोलिस प्रमुख चौधरी सलीम यांच्याकडून सांगण्यात आले आहे. लष्कर आणि पोलिस कोणत्याही आणीबाणीचा सामना करण्यास सज्ज असल्याचेही ते म्हणाले. लाहोर पोलिसांकडून सर्व संवेदनशील विभागांना सुरक्षा वाढविण्यासंबंधीचे पत्रक जारी करण्यात आले असून त्यात ३६ प्रमुख जिल्ह्यांचाही समावेश आहे.

अतिरेकयांकडून पाकिस्तानी अणुप्रकल्पाला प्रथमच हल्ल्याचा धोका निर्माण झाला असून सूत्रांनी तेहरीक इ तालिबान पाकिस्तान या संघटनेकडून हे हल्ले होतील असा इशारा दिला आहे. पाकिस्तानच्या अणु उर्जा आयोगाच्या अधिकार्‍यांनी देरा गाझी हा पाकिस्तानातील प्रमुख आणि महत्त्वाचा अणुप्रकल्प असल्याने त्याच्या संरक्षणासाठी विशेष योजना केली गेल्याचे सांगितले आहे. बंदी असलेल्या दहशतवादी संघटनांवर लष्करातर्फे छापे टाकण्यात येत असल्याचेही समजते.

Leave a Comment