अन्न औषध प्रशासन धडक मोहिमेने गर्भपातांच्या औषधांचा तुटवडा

पुणे दि.७ –  महाराष्ट्रात स्त्रीभ्रूण हत्या आणि गर्भलिंग चिकित्सेचा मध्यंतरी जो डोंब उसळला त्यानंतर राज्य शासनाने याविरोधात उचललेल्या कडक पावलांचा फटका वेगळ्या अर्थानेच वैद्यकीय विश्वाला बसला असल्याचे अनुभवास येत आहे. डॉक्टर्स आणि केमिस्ट विरोधात राबविल्या गेलेल्या छापा सत्रांमुळे गर्भपातासाठी वापरण्यात येणारी औषधेच आता बाजारातून गायब होऊ लागली आहेत त्यामुळे महिलांना कायद्याने मिळालेल्या गर्भपात अधिकारावरच गदा आली असल्याचे बोलले जात आहे.

गेल्या कांही आठवड्यांत अन्न व औषध प्रशासनाने डॉक्टर्स आणि केमिस्ट यांच्यावर छापे टाकून मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सीसाठी लागणारी कीट जप्त करून त्यांच्यावर केसेस दाखल केल्या आहेत. ही कीट किंवा औषधे ज्या महिलांनी खरेदी केली, त्यांचे पत्ते द्या, फोन द्या असे तगादे या अधिकार्‍यांनी लावले आहेतच पण संबंधित महिलांच्या नोंदी का केल्या नाहीत म्हणूनही डॉक्टर्स आणि केमिस्टना दोषी ठरविले आहे. अन्न औषध प्रशासनाच्या अधिकार्‍यांच्या या असभ्य वर्तणुकीमुळे केमिस्टनी संबंधित औषधे कंपन्यांकडे परत पाठविली आहेत असे केमिस्ट होलसेलर असो. पदाधिकार्‍यांनी सांगितले.

या कारवाईमुळे ही औषधे तयार करणार्‍या कंपन्यांनीही त्यांची औषधे बाजारातून काढून घेण्याचा निर्णय घेतला असून सिप्ला सारख्या बड्या कंपन्यांनीतर त्यांचे उत्पादनच बंद केले आहे. राज्यात करण्यात येत असलेले गर्भपात हे फक्त लिंगचिकित्सेतूनच किवा मुलीचा गर्भ आहे म्हणून केले जात नाहीत. कित्येकवेळा संबंधित महिलेच्या तब्येतीच्या तक्रारी लक्षात घेऊन किवा व्यंग असलेले गर्भ असल्यास गर्भपात केले जातात. वास्तविक भारतीय दंड विधान १९७१ च्या कायद्यानुसार महिलेला मूल नको असल्यास गर्भपात करण्याचा अधिकार मिळाला आहे आणि कायदेशीर गर्भपाताला मान्यताही आहे. अर्थात लिंगचिकित्सा करून गर्भपात करणे हा मात्र गुन्हा आहे.

२०१० साली ड्रग कंट्रोलरनी इमर्जन्सी ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह गोळ्यांची जाहिरात करण्यास बंदी घातली आहे.ही गोळी गर्भधारणा टाळण्यासाठी आहे तर मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सीची औषधे गर्भपातासाठी दिली जातात. डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे देशातील १० टक्के गर्भपात लिंगचिकित्सेतून केले जातात मात्र नको असतानाही गर्भधारणा झाली असेल अथवा अन्य महत्त्वाचे कारण असेल तरी या महिलांना आता गोळ्या  न मिळाल्याने सर्जरी करायची वेळ येईल आणि त्यात अधिक धोका आहे असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

Leave a Comment