पारनेर: टीम अण्णाच्या बरखास्तीनंतर जनतेला समर्थ राजकीय पर्याय उपलब्ध करून देण्याची भाषा करणार्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आता मात्र राजकारण प्रवेशापासून काढता पाय घेण्याचे सूचित केले आहे. इतकेच नव्हे तर अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या सहकार्यांनी राजकीय पक्ष स्थापन केला तरी त्याच्या प्रचारासाठीही मैदानात न उतरण्याचा निर्णय अण्णांनी जाहीर केला आहे.
अण्णांनी जंतर मंतरवरील आंदोलन संपुष्टात आणल्यावर एकतर गप्प राहणे पसंत केले किंवा अनेकदा परस्पर विरोधी भूमिका जाहीर केल्या. सध्या अण्णांनी कोणाचाही प्रत्यक्ष प्रचार करण्याऐवजी केवळ जनतेला जागृत करून त्यांना विधानसभेत आणि लोकसभेत योग्य उमेदवार निवडून देण्यासाठी प्रवृत्त करण्याची भूमिका घेतली आहे. मात्र योग्य उमेदवार कोण हे अण्णा सांगणार नाहीत.
आपल्या भूमिकांमध्ये सातत्य न ठवल्याने अण्णांच्या पाठीराख्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. दुसरीकडे राजकीय पक्षाच्या स्थापनेवरून अण्णा आणि केजरीवाल यांच्यात; तर कोळसाकांड प्रकरणी केजरीवाल आणि किरण बेदी यांच्यात मतभेद चव्हाट्यावर आल्याने कार्यकर्ते आणि त्यांच्या आंदोलनाच्या पाठीशी उभे राहणार्या सर्वसामान्य नागरीकांमधेही गोंधळाचे वातावरण आहे.