भाषा शास्त्रातील करिअर

जग जवळ आलेले असल्यामुळे विविध देशांमधील आर्थिक, सांस्कृतिक देवाणघेवाण वाढत चालली आहे. त्यामुळे निरनिराळ्या देशांच्या भाषा शिकणे आवश्यक झालेले आहे आणि त्याचाच फायदा घेऊन जर्मन, फ्रेंच, रशिया या भाषा शिकविणारे वर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत चालले आहेत. काही विद्यापीठात तर परदेशी भाषा विभाग स्वतंत्रपणे सुरू करण्यात आलेले आहेत. परंतु भाषेचा वेगळ्या पद्धतीने अभ्यास करणारेही एक शास्त्र आहे, त्याला भाषाशास्त्र किंवा लिंग्विस्टिक असे म्हटले जाते.

यामध्ये कोणतीही एक भाषा शिकण्याला महत्व नसते तर भाषेचे शास्त्र काय असते, भाषा कशा उगम पावतात, त्यातील शब्द कसे तयार होतात, त्या शब्दांचा ती भाषा बोलणार्‍या लोकांच्या संस्कृतीशी निकटचा संबंध असतो, तो कसा असतो? याचा शोध, बोध आणि अभ्यास भाषाशास्त्रात केला जात असतो. भाषेचा संबंध विविध जनसमुदायांच्या विविध गोष्टींशी येत असल्यामुळे भाषाशास्त्राचा अभ्यास हा फार गहन आणि व्यापक असतो. सध्या सार्‍या जगातच काही भाषा मरत चालल्या आहेत. त्यांना जगवण्यासाठी भाषाशास्त्रज्ञांची गरज असते. अजून तरी लोकांना या शास्त्राचे महत्व म्हणावे तेवढे समजलेले नाही. परंतु भाषाशास्त्र हे पुढच्या काळामध्ये चांगलीच रोजगार संधी उपलब्ध करून देण्यास उपयुक्त ठरणारे आहे. भाषाशास्त्रात पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम पुरवले जातात. मुंबई विद्यापीठात भाषाशास्त्राची एम.ए. डिग्री आहे.

तमिळनाडूतील कोईमतूर येथे असलेल्या भारतीय विद्यापीठाने भाषाशास्त्राच्या अभ्यासाची विशेष सोय उपलब्ध करून दिलेली आहे. या सोयीचा लाभ घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांनी www.b-u.ac.in या पत्त्यावर संपर्क साधून अधिक माहिती प्राप्त करावी. हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठात सुद्धा एम.ए. लिंग्विस्टिक अभ्यासक्रम असून, त्याला प्रवेश घेण्यासाठी कोणत्याही विद्या शाखेचा पदवीधर प्राप्त समजला जातो. मात्र अशा विद्यार्थ्याने दहावीनंतरची किमान दोन वर्षे कोणत्याही एका भाषा विषयाचा अभ्यास केलेला असणे आवश्यक आहे. त्याला त्या दोन वर्षामध्ये किमान २०० मार्क भाषाविषयक अभ्यासक्रमासाठी असले पाहिजे आणि तो या भाषा विषयात किमान ४० टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झालेला असला पाहिजे. या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याआधी प्रवेश परीक्षा घेतली जाते.

अधिक माहितीसाठी www.osmania.ac.in या संकेत स्थळावर संपर्क साधावा. कोलकत्ता विद्यापीठात सुद्धा भाषाशास्त्राचा पदव्युत्तर पदवीचा अभ्यासक्रम आहे आणि त्याला प्रवेश घेण्याच्या अटी साधारणत: कोईमतूरच्या अटी सारख्याच आहेत. एकंदरीत पुढच्या काळामध्ये इंजिनिअरपेक्षा सुद्धा भाषा विषयक अभ्यास करणार्‍यांना महत्व दिले जाणार आहे.