राज यांचा सूरक्षेत्रला हिरवा झेंडा

मुंबई: आतापर्यंत चित्रित झालेल्या भागांच्या पुढे पाकिस्तानी कलाकारांना घेऊन कार्यक्रम न करण्याचे आश्वासन सूरक्षेत्रच्या निर्मात्यांनी दिल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या कार्यक्रमाच्या प्रसारणाला हिरवा झेडा दाखविला.

पाकिस्तान दहशतवाद्यांना खतपाणी घालत असताना त्यांच्या कलाकारांचे कौतुक आपण का करायचे; अशा भूमिकेतून ठाकरे यांनी पाकिस्तानी कलाकारांचा समावेश असलेल्या सूरक्षेत्रला विरोध केला होता. त्यावरून ज्येष्ठ गायिका आशा भोसले आणि राज यांच्यात शाब्दिक खटकेही उडाले.

मात्र गुरुवारी कार्यक्रमाचे निर्माते बोनी कपूर यांनी कलर्स आणि सहारा वाहिनीच्या अधिकाऱ्यांसह राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांची समजूत काढली. मोठा खर्च करून या कार्यक्रमाच्या काही भागांचे चित्रण दुबईत करण्यात आले. या पुढच्या भागात पाकिस्तानी कलाकारांचा समावेश करणार नाही; असे आश्वासन त्यांनी राज यांना दिले. त्यानंतर ठाकरे यांनी सूरक्षेत्र प्रसारित करण्यास हरकत नसल्याचे सांगितले.

मात्र यापुढे असले प्रकार खपवून घेणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला. पाकिस्तानी कलाकारांनी पाकिस्तानच्या भारतविरोधी कारवायांचा निषेध करावा; असे आवाहनही त्यांनी केले.

Leave a Comment