पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर गॅस गळती

पुणे: पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर गॅसच्या टँकरला गुरुवारी दुपारी साडेबाराच्या दरम्यान एका ट्रकने भरधाव वेगाने येऊन धडक दिल्याने टँकरमधून गॅस गळती सुरू झाली. या प्रकारामुळे स्थानिक नागरिक आणि प्रशासनातही खळबळ उडाली. खंडाळा परिसरातील शाळा सोडून देण्यात आल्या. तसेच लोणावळा खंडाळा परिसरातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे प्रयत्न सुरू झाले. तब्बल सात तासाने गळती थांबविण्यात अग्निशामक दल आणि तज्ज्ञांना यश आले.

गुरुवारी दुपारी खंडाळा बाह्यवळण मार्गाजवळ ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने हा ट्रक गॅसच्या टँकरवर आदळला. त्यामुळे टँकरची टाकी फुटून एलपीजी गॅसची गळती सुरू झाली. या टाकीत ३० टन गॅस होता. लोणावळा आणि खोपोली नगर परिषदेचा प्रत्येकी एक आणि आयआरबीचा एक अग्निशामक बंब घटनास्थळी तातडीने दाखल झाला. त्यांनी प्रथम पाण्याचे फवारे मारून गॅसचा धोका टाळण्याचा प्रयत्न केला आणि नंतर गळती थांबविण्याचे प्रयत्न केले.

या अपघातामुळे द्रुतगती महामार्गावरील वाहतूक जुन्या महामार्गावर वळविण्यात आली. मात्र काही वेळातच वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. त्याचा फटका घटनास्थळी निघालेल्या तज्ज्ञांनाही बसला. त्यांना पोहोचण्यासाठी दुपारचे ३ वाजले. अखेर अथक प्रयत्नाने संध्याकाळी ६ च्या सुमारास गळती थांबविण्यात यश आले.

Leave a Comment