धरणीमाय सुखावली

महाराष्ट्राच्या दुष्काळाने होरपळत असलेल्या जिल्हयांना पूर्वा नक्षत्राने दिलासा दिला आहे. हा पाऊस पावसाळ्यातलाच आहे. पूर्वा नक्षत्र येत्या १३ तारखेला संपेल आणि परंपरागत भाषेत सांगायचं तर उत्तरा नक्षत्राचा पाऊस आणि शास्त्रीय भाषेत सांगायचं तर परतीचा पाऊस सुरू होईल. आपल्या पूर्वजांनी पावसाचे जे आडाखे आणि अंदाज अनुभवाने मांडले आहेत त्यांच्यानुसार या परतीच्या पावसाळ्यातल्या नक्षत्रातला पाऊस जोरदार असतो. या काळात ऊनही चपापणारे असते आणि त्यामुळे पाऊस पडलाच तर तो जोरदार असतो. तसा विदर्भ मराठवाड्याला मुसळधार पाऊस फार दुर्मिळ. तो छान कोसळावा तर कोकणातच. त्या पावसाची मिजास त्या भागात एवढी की, उडत्या पाखरांच्या पंखावरही शेवाळं साचावं. तिकडे मुसळधार पाऊस नित्याचा पण मराठवाड्यात मुसळधार पाऊस पहायला मिळतो तो या परतीच्या पावसाच्या नक्षत्रातच. उत्तरा जोरदार पडतात पण त्यानंतरचं हस्त नक्षत्र तर हत्तीच्या पायाएवढ्या धारा घेऊन येतं.

या नक्षत्राचं ऊनही फार कडक म्हणूनच शिकलेले लोक त्याला ऑक्टोबर हीट म्हणत असतात. एकवेळ वैशाखातलं कडक ऊन परवडलं पण हे हस्तातलं ऊन परवडत नाही. त्या उन्हानं माणसे आजारी पडतात. पण या उन्हात आणि वैशाखातल्या (म्हणजे मे महिन्यातल्या) उन्हात एक फरक असतो. हस्तातलं ऊन कडकही असतं आणि औषधीही असतं. या उन्हात आपल्या घरातल्या जुन्या पोथ्या आणि पुस्तकं दिवसभर ठेवली की त्यांना कसर (म्हणजे वाळवी ) लागत नाही. याच नक्षत्रात जुन्या रेशमी साड्या, शालू यांनाही ऊन दाखवलं जातं. वर्षातून एकदा हा सोपस्कार केला की नंतर पुढच्या वर्षापर्यंत पेस्ट कंटल करण्याची गरज नाही. हस्त नक्षत्रातली पावसाची एक मोठी सर पूर्ण पावसाळ्यातल्या पावसाची सगळी सरासरी गाठून देत असते. रबीच्या पिकांची पेरणी वेळेवर झाली असेल तर हस्त नक्षत्राच्या पावसातल्या नुसत्या ढगांच्या गडगडाटानं या पिकाला लागलेली कीड नाहीशी होते. म्हणूनच म्हणतात, ‘हस्त गडगडी- कीडा मुंगी रगडी’. या पावसाने निर्माण केलेली ओल फार काळ टिकते. पावसाळा नियमित पडत गेला आणि मृगापासून त्यानं गुंगारा न देता हजेरी लावली की हस्तातल्या पावसात नद्या उफाणून वहायला लागतात. विहिरी तुडुंब भरतात. पिकं छान येतात. म्हणूनच म्हणतात, बरसेल हस्त तर शेतकरी मगरमस्त.परतीच्या पावसातली शेवटची दोन नक्षत्रं फार महत्त्वाची. ती म्हणजे चित्रा आणि स्वाती.

या दोन नक्षत्रातला पाऊस पडला की रबीची पिकं विशेषतः ज्वारी हमखास छान येणार. ‘पडतील चित्रा स्वाती तर पिकतील माणिक मोती.’ हे सारे अनुभवाने निर्माण केलेले शहाणपण आता कामी येईनासे झाले आहे कारण आता पाऊस पडत असला तरीही तो सरासरीएवढा नाही. नांदेड जिल्हयात यंदा पिकाच्या पोटापुरता पाऊस पडला. पिके आली. प्यायच्या पाण्याचाही प्रश्न काहींसा सुटला पण नद्या वाहिल्या नाहीत आणि विहिरी भरण्याची काही चिन्हे नाहीत. यंदा ऊन पावसाचा खेळ चांगलाच अनुभवाला आला पण एकंदरीत पावसाने माणसाला तारले. जनावरांना मात्र उपाशी ठेवले.निदान काही जिल्हयात तरी अशीच स्थिती आहे. पावसाचा असा लपंडाव सुरू झाला की हवामानाच्या आणि पावसाच्या अंदाजांच्या शास्त्राची फार चर्चा होते.

कारण आता सरकारने स्थापन केलेल्या हवामान खात्यानं त्याला सुधारित साधनं उपलब्ध झाली असल्याने अजूक अंदाज व्यक्त केल्याचा दावा केला आहे. ते दावे फोल आहेत असे वातावरण निर्माण झालं आहे. विशेषतः पावसाने ओढ दिली की आपल्याला काळजी वाटायला लागते आणि त्या मनस्थितीत आपले विश्लेषण म्हणावे तेवढे वस्तुनिष्ठ होत नाही. वेधशाळेच्या अंदाजांपेक्षा पंचांगांतले अंदाज बिनचूक आहेत असे दाखवण्याचा काही लोकांनी प्रयत्न चालविला आहे पण तोही वस्तुनिष्ठ नाही. काही लोकांना नव्याची टिगल करण्याची आणि जुने ते सोने म्हणून जुन्याला कवटाळण्याची खोडच असते. अशा लोकांनी हे दावे सुरू केले आहेत पण ते शास्त्रीय निकषाला उतरणारे नाहीत.

आपल्याला प्रगती करायची असेल तर कोणत्याही गोष्टीची पूर्वग्रहदूषित पद्धतीने मीमांसा करून चालत नाही. हे सांगताना पंचांगांतल्या अंदाजांतला एक दोष नक्कीच दाखवावा लागेल तो म्हणजे हे अंदाज सांगताना स्थळांचा उल्लेख कधीच केलेले नसतात. या नक्षत्रात पाऊस पडेल असे म्हटलेले असते. मग तो अंदाज कोणत्या गावासाठी आणि कोणत्या प्रदेशासाठी असतो याचा उल्लेख कधीच केलेला नसतो. तो अंदाज चेरापुंजीला लागू होतो की जैसलमेरला लागू होतो याचा खुलासा पंचांगात नसतो. काही पंचांगांत महाराष्ट्रातला अंदाज म्हटलेले असते पण महाराष्ट्रातला म्हणजे कोकणाचा की विदर्भाचा याचे काहीच स्पष्टीकरण केलेले नसते. मग या अंदाजांचा एवढा बडीवार माजवण्याचे काहीच कारण नाही. पण जाता जाता एवढेच सांगावेसे वाटते की, पाऊस कितीही कमी पडो की जास्त पडो. जमेल तेवढे पाणी जिरवा तरच नेहमीची हाकहाक संपणार आहे.

Leave a Comment