पुणे दि.६ – अंधश्रद्धेतून स्वतःची पत्नी आणि तीन लहान मुलांना विष पाजून जाळून मारल्याची धक्कादायक घटना आज पहाटे साडेपाचच्या सुमारास कोथरूड परिसरात घडली. कर्नाटकातून आलेल्या परशुराम कालकट्टी याने त्यानंतर स्वतःलाही पेटवून घेतले. त्यामुळे झालेल्या जखमांत त्याचाही मृत्यू झाला असल्याचे समजते.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार परशुराम मजूर म्हणून काम करत होता. आपल्या कुटुंबावर कोणीतरी काळी जादू करत आहे असा त्याला संशय होता. त्या भीतीने त्याने पत्नी गायत्री वय ३०, मुली पायल व मनीषा वय अनुक्रमे सात व पाच व मुलगा करण वय तीन यांना विष पाजले आणि नंतर घराबाहेर ओढत आणून त्यांना पेटवून दिले. मुलगा करण याला तर त्याने कचर्याच्या गाडीत फेकले. सर्वजण मदतीसाठी ओरडत होते मात्र त्याचा उपयोग होऊ शकला नाही. नंतर परशुरामने स्वतःलाही पेटवून घेतले. त्यात त्याचाही मृत्यू झाला.
परशुरामच्या सासूने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार परशुराम अंधश्रद्धाळू होता आणि आपल्या कुटुंबावर कुणीतरी करणी करत आहे असा त्याचा समज झाला होता. त्यातूनच त्याने हे भयानक कृत्य केले असावे असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.