नक्षलवादी वाढवताहेत संहारक शक्ती: शिंदे

नवी दिल्ली: नक्षलवादी संघटना मोठ्या प्रमाणावर शस्त्र जमा करून आपली संहारक शक्ती वाढविण्याच्या प्रयत्नात असून नव्या बटालियनच्या उभारणीचा त्यांचा संकल्प आहे; असा इशारा गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिला.

देशातील पोलीस महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षकांच्या तीन दिवसीय वार्षिक संमेलनाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते.

नक्षलवादी चळवळ हे देशासमोर उभे असलेले मोठे आव्हान असून नक्षलवादी सशस्त्र संघटनांनी स्थानिक आदिवासींची भरती करून आपले बळ वाढविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यांना आधुनिक शस्त्र वापरण्याचे प्रशिक्षण देऊन दहशतवादी हल्ल्यात वाढ करण्याचा त्यांचा मनसुबा आहे; असे शिंदे यांनी सांगितले.

नक्षलवादाला तोंड देण्यासाठी राज्याच्या पोलीस दलांना आवश्यक त्या सर्व सुविधा देण्याबरोबरच कडव्या डाव्या गटांबरोबर चर्चा, सुरक्षा, विकास आणि प्रभावी प्रशासनाद्वारे नक्षलवादाला मिळणारा पाठींबा रोखण्याचे केंद्र शासनाचे धोरण आहे; असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.

नक्षलवाद प्रभावित राज्यांनी पोलिसांच्या संख्येत वाढ, गुप्तवार्ता विभागाचे सबलीकरण, नक्षलवादी दहशतवाद्यांच्या गनिमी काव्याला प्रत्युत्तर देण्यासाठी स्वतंत्र दलाची उभारणी अशा उपायांची अंमलबजावणी करण्याची आवश्यकता शिंदे यांनी प्रतिपादन केली. शस्त्र खरेदी, दळणवळण आणि संपर्क साधने, पोलीस ठाणी आणि पोलिसांच्या निवासी संकुलांची उभारणी यासाठी राज्यांनी अधिक निधी उपलब्ध करून द्यावा असे आवाहनही त्यांनी केले.

नक्षलवादाचा प्रभाव कायमस्वरूपी नष्ट करण्यासाठी राज्यांनी नक्षलग्रस्त भागात सर्वांगीण विकासाचे प्रयत्न जोमाने केले पाहिजेत; असेही शिंदे म्हणाले.