गॅलॅक्सी एस थ्रीची तडाखेबंद विक्री

सोल दि.६- सॅमसंगने त्यांच्या गॅलॅक्सी एस थ्री या स्मार्टफोनची तीन महिन्यांच्या कालावधीत जागतिक बाजारात तब्बल २० दशलक्ष युनिट विकली गेली असल्याचे जाहीर केले आहे. गुगल अँड्राईड ऑपरेटिंग सिस्टीम असलेला हा स्मार्टफोन मेमध्ये युरोपच्या बाजारात दाखल झाला होता. अॅपल, नोकिया आणि मोटोरोला या प्रतिस्पर्धी कंपन्यांचे स्मार्टफोन बाजारात येण्याअगोदरच हा फोन बाजारात आणण्यात आला होता.आणि कंपनीच्या अपेक्षेप्रमाणेच त्याला ग्राहकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला असे सॅमसंग इलेक्ट्रोनिक्स कंपनीने जाहीर केले आहे.

गॅलॅक्सी एस थ्रीच्या तडाखेबंद विक्रीमुळे सॅमसंगचे बाजारातील अव्वल स्थान कायम राहण्यास मोठाच हातभार लागला असल्याचे कंपनीच्या स्ट्रेटीजी विश्लेषकांचे म्हणणे आहे. अॅपलने त्यांच्या उत्पादनांची कॉपी सॅमसंग कडून केली जात असल्याबद्दल अमेरिकी न्यायालयात कॉपी राईटचा दावा लावला होता त्यात गेल्या आठवड्यात गॅलॅक्सी एस थ्री मध्येही अॅपलची कॉपी केली असल्याचे नव्याने समाविष्ट केले आहे.