भाजपाही आळवतोय -मी मराठी- चा सूर

मुंबई दि.५- तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेने मराठी माणूस हा मुद्दा अधिक प्रकर्षाने चर्चेला घेतला असतानाच भाजपही आता मी मराठीचा सूर आळविण्याची तयारी करत आहे. नुकत्याच पार पडलेल्या पक्षाच्या कोअर कमिटी बैठकीत वरीष्ठ नेत्यांनी मुंबई आणि ठाणे भागासाठी मराठी पताका फडविण्याचा निर्णय घेतला आहे असे समजते.

विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते विनोद तावडे यासंदर्भात म्हणाले की आमचा पक्ष राष्ट्रीय पक्ष आहे आणि सर्व राज्यांसाठी पक्षाचा आदर्शवाद एकच आहे. प्रत्येक राज्याला त्यांच्या स्वतःच्या योजना आखून त्याप्रमाणे पक्षाचा राजकीय नकाशा बनविणे आणि विविध स्तरांवरील क्षेत्रांसाठी त्याचा योग्य वापर करणे गरजेचे आहे. मुंबई ठाणे येथे विधानसभेच्या ६० जागा असून त्यात कोंकण मिळविले तर ही संख्या १०० वर जाते. हा सारा भाग मराठी भाषिकांचे वर्चस्व असलेला आहे. त्यामुळे मी मराठीचा सूर आळविण्यात गैर नाही. अर्थात मी मराठी म्हणजे अन्य भाषिकांना विरोध असा त्याचा अर्थ काढू नये. आमच्या पक्षाच्या सर्वसमावेशक राजकारणावर विश्वास आहे.

राज्यप्रमुख सुधीर मुनगंटीवार यांनीही प्रत्येक विभागात सांस्कृतिक सेल स्थापण्यात येत असल्याचे आणि पहिला सेल लेखक विश्वनाथ बापट यांच्या नावाने सुरू करण्यात येत असल्याचे सांगितले आहे. या सेलच्या माध्यमातून प्रसिद्ध लेखक, कवी, थिएटर तसेच सिनेमा कलाकार यांच्याविषयीचे कार्यक्रम वर्षभर साजरे करण्यात येणार आहेत असेही ते म्हणाले.

 राज्याचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी महाराष्ट्रात मराठी माणसासाठी कांही करणे गैर नाही असे सांगत कर्नाटकांत आम्ही कानडींसाठी सारे कांही करतो असे सांगितले. ते म्हणाले मराठी माणूस ही कांही फक्त शिवसेना आणि मनसेची मिरासदारी नाही. मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपने ३२ जागा मिळविल्या आहेत आणि त्या सर्व मराठी बहुसंख्य असलेल्या भागातूनच मिळविल्या आहेत. तसेच मुंबई आणि ठाणे विभागात संघाचे कार्यकर्ते सातत्याने कार्य करत आहेत त्यांनाही विसरून चालणार नाही. अर्थात मराठीचा सूर आळविताना महाराष्ट्रातील गुजराथी आणि उत्तरप्रदेशींकडेही आम्ही दुर्लक्ष करणार नाही.

Leave a Comment