तालिबानी अतिरेक्यांकडून पाकिस्तानला हल्यांचा धोका

इस्लामाबाद दि. ५ – येत्या दोन आठवड्यात तालिबानी अतिरेकी त्यांच्या तुरूंगातील सदस्यांना सोडविण्यासाठी इस्लामाबाद आणि रावळपिंडी शहरातील महत्त्वाच्या सरकारी कार्यालयांवर हल्ले चढविण्याची शक्यता असल्याचा इशारा पाकिस्तानच्या इंटेरियर मिनिस्ट्रीकडून देण्यात आला आहे. रावळपिंडी येथील अदिआला तुरूंगात लष्करे तैय्यबाचा कमांडर झकीउर रेहमान लखवीला ठेवण्यात आले असून लखवी मुंबईवरच्या २००८ च्या हल्यामागचा मास्टरमाईंड असल्याचे भक्कम पुरावे मिळाले आहेत. त्याच्या सुटकेसाठीच पाकिस्तानी तालिबानींकडून हे हल्ले होतील असा इशारा देण्यात आला आहे.
 
नॅशनल क्रायसिस मॅनेजमेंट सेलकडून दिल्या गेलेल्या या अहवालानुसार १६ पाकिस्तानी तालिबानी अतिरेक्यांचा तळ (तेहरीक ए पाकिस्तान) पंजाब प्रांतातील अटोक येथे लपले असून हे सर्व प्रशिक्षित अतिरेकी आहेत. पाकिस्तानातील सरकारी संस्थावर हल्ले तसेच महत्त्वाच्या व्यक्तींचे अपहरण करण्याचा कट त्यांनी आखला असून अदिआला तुरूंगावर हल्ला करून लखवीची सुटका करण्याचा त्यांचा बेत आहे. हा अहवाल  सर्व सरकारी कार्यालये आणि पोलिस विभागांना पाठविण्यात आला आहे असेही समजते.

भारत आणि कांही परदेशी गुप्तवार्ता विभागांनी यापूर्वीच अदिआला तुरूंगात असलेल्या लखवीकडे मोबाईल असल्याची व त्याद्वारे तो त्याच्या संघटनेतील अन्य सदस्यांशी संपर्कात असल्याची खात्री करून घेतली आहे.

Leave a Comment