मुंबई दि.५ – पायलटस्च्या कमतरतेसह अनेक अडचणींचा सामना करत असलेल्या एअर इंडियाला आता पुन्हा मोठा दणका बसण्याची चिन्हे दिसू लागली असून या कंपनीच्या ४५० हून अधिक पायलटस्नी अन्य विमानकंपन्यांकडे नोकरीसाठी अर्ज केले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. तर उर्वरित पायलटनी पुन्हा संपाचे हत्यार उपसायचा निर्णय घेतला असल्याचेही समजते. त्यामुळे या महाराजाचे सिंहासन आता डळमळू लागले असल्याचे संकेतही मिळू लागले आहेत.
यासंबंधी मिळालेल्या माहितीनुसार या विमान कंपनीच्या पायलट ना गेले कित्येक महिने पगार मिळालेला नाही. त्यामुळे मध्यंतरी ५८ दिवसांचा संप पुकारला गेला होता. त्याचा फायदा अन्य खासगी विमान कंपन्यानाच अधिक झाला. पायलटचे पगार देण्याचे आणि कामासाठी योग्य वातावरण उपलब्ध करून देण्याचे कंपनीने दिलेले आश्वासन पाळले गेलेले नाहीच पण उलट उत्पादनावर आधारित देण्यात येत असलेल्या इंन्सेंटिव्हमध्येही ७० टक्के कपात केली गेली आहे. अॅडिशनल क्रू मेंबर म्हणून असलेली विमान प्रवास सुविधा काढून घेण्यात आली आहे व ठरलेल्या तासांपेक्षा कितीतरी अधिक तासांची ड्यूटी पायलटना बजावावी लागते आहे. या सार्या प्रकारांना कंटाळलेल्या पायलटनी अन्य विमान कंपन्यात नोकर्या घेण्याचा निर्णय घेतला आहे.
पायलटस असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार संपकाळात निलंबित करण्यात आलेल्या १०१ पायलटपैकी फक्त ५८ जणांना पुन्हा नोकरीत घेण्यात आले आहे. अन्य विमानकंपन्या इन्सेंटिव्ह तसेच कोणत्याही कंपनीच्या विमानातून क्रू मेंबर म्हणून प्रवास करण्याची मुभा देतात मात्र एअर इंडियाने ती सुविधा काढून घेतली आहे. पायलटशी चणचण असल्याने ठराविक तासांपेक्षा अधिक काळ पायलटना उड्डाणे करावी लागत आहेत त्यातच पगार दिले जात नाहीत. एअर इंडियाकडे सध्या ८०० पायलट असून पैकी ४५० जणांनी अन्यत्र नोकर्या शोधल्या आहेत.
केंद्रीय विमानवाहतूक मंत्री अजितसिंग यांनी लोकसभेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पायलटची संख्या कमी असल्याचे मान्य केले होते. बोईंग ७८७ साठी ९० पायलटची गरज असताना सध्या फक्त ४ पायलट आहेत तर बोईंग ७७७ साठी ३९६ पायलट हवे आहेत मात्र सध्या २९७ पायलटवरच काम भागविले जात आहे असेही समजते.