सौंदर्य प्रसाधनांबाबत सावध

सौंदर्य प्रसाधनांमुळे सौंदर्य वाढते पण आरोग्य वाढते का, याचा विचार कोणी करत नाही. आपल्या पूर्वजांनी सौंदर्य वाढविण्यासाठी हळद, चंदन, दाळीचे पीठ, दुधावरची साय, लिबू यांचा वापर करण्याचा सल्ला दिलेला आहे आणि त्याने सौंदर्य वाढते असा अनुभव सुद्धा आहे. या पारंपरिक सौंदर्य प्रसाधनांचे कसलेही विपरीत परिणाम शरीरावर होत नाहीत, हे त्यांचे एक वैशिष्ट्य आहे.

मात्र अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणावर वापरली जाणारी बाजारातली सौंदर्य प्रसाधने या संदर्भात फारच धोकादायक आहेत. कारण त्यांच्यामुळे सौंदर्य वाढत असले तरी त्यांचे आरोग्यावर मोठे घातक परिणाम होत असतात, असे आढळले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने गेल्या महिन्यात एक इशारा जारी केला आहे.

त्वचेला तकाकी देणार्‍या सौंदर्य वर्धक साबणांपासून आणि विविध प्रकारच्या क्रीम्स्, आय मेकअप, क्लिन्सिंग करणारी रसायने, मस्कारा इत्यादी सौंदर्य प्रसाधनांमध्ये पार्‍याचा वापर होतो. या पार्‍यापासून ही सौंदर्य प्रसाधने वापरणार्‍या स्त्रियांना कर्करोगाचा विकार जडू शकत असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. या संघटनेने असा इशारा दिला असला तरी सौंदर्य प्रसाधनांचे उत्पादन करणार्‍या कंपन्या मात्र आपल्या उत्पादनच्या पॅकवर त्यात वापरल्या जाणार्‍या सगळ्या घटकांची माहिती देत नाहीत. या संबंधात भारतातल्या कंझुमर असोसिएशन ऑफ इंडिया या संघटनेनेही नाराजी व्यत्त* केली आहे.

आपल्या उत्पादनात वापरले जाणारे रंग कोणत्या प्रकारचे आहेत आणि त्यात कोणती रसायने वापरलेली आहेत याचा तपशील उत्पादनाच्या पॅकवर असला पाहिजे, असा नियम असताना सुद्धा भारतातल्या अगदी आघाडीच्या कंपन्या सुद्धा हा नियम पाळत नाहीत. प्रत्यक्षात ही उत्पादने किती घातक आहेत हे जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केले आहे. विशेषतः पारा आणि शिसे या दोन धातूंचा वापर सौंदर्य प्रसाधनात होत असतो.

अमेरिका, ब्रिटन, जर्मनी या देशांमध्ये या उत्पादनांच्या घटकांचा कसून शोध घेतला जातो आणि कर्करोगास कारणीभूत ठरणारी ही द्रव्ये त्यात असतील त्यांना विक्रीची परवानगी दिली जात नाही. भारतात मात्र या बाबतीत फारच बेपर्वाई दाखविली जाते. त्यामुळे सौंदर्य प्रसाधने वापरणार्‍या महिलांनी सावध राहण्याची गरज आहे. संघटनेने म्हटल्याप्रमाणे शाम्पूमध्ये दहा रसायने वापरली जातात. त्यातील सोडियम लोविल सल्फेट हे डोळ्यांचा दाह होण्यास कारणीभूत ठरू शकते. लिपस्टिकमध्ये सर्वसाधारणपणे ३० रसायनांचा वापर केलेला असतो आणि त्यातील पॉलिमिथाईल मेथाक्राएट हे त्वचेचा कॅन्सर होण्यास कारणीभूत ठरू शकते. नेलपॉलिश मध्ये ३०, केसांच्या रंगामध्ये ११, डिओडरंटमध्ये ३२ तर फौंडेशनमध्ये २० रसायने वापरलेली असतात. यातली काही रसायने फार घातक असतात.

Leave a Comment