शिवसेनाप्रमुखांची सुषमांना पसंती

मुंबई: कोळसा खाण घोटाळ्याच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाला केंद्रातील सत्ता हस्तगत करण्याची खात्री असून पंतप्रधान पदासाठी पक्षातील स्पर्धेला ऊत आला आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील भाजपचा जुना सहकारी असलेल्या शिवसेनेचे सर्वेसर्वा बाळासाहेब ठाकरे यांनी पंतप्रधान पदासाठी लोकसभेतील विरोधी पक्ष नेत्या सुषमा स्वराज यांचे नाव सूचित करून या स्पर्धेला नवे वळण दिले आहे.

कोळसा खाण घोटाळा प्रकरणी रालोआच्या भूमिकेबद्दल चर्चा करण्यासाठी आणि बाळासाहेबांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी स्वराज यांनी नुकतीच मुंबईत बाळासाहेबांची भेट घेतली. त्यानंतर पंतप्रधान पदासाठी बाळासाहेबांची स्वराज यांच्या नावाला पसंती असल्याचे बाळासाहेबांच्या निकटवर्ती खासदाराने दिल्ली येथे खाजगी चर्चेत स्पष्ट केले. बाळासाहेब लवकरच आपली पसंती भाजप आणि रालोआ नेतृत्वापर्यंत पोहोचवतील; असेही या सूत्राने सांगितले. आतापर्यंत पंतप्रधान पदाच्या चर्चेत नसलेल्या स्वराज यांचा बाळासाहेबांच्या भूमिकेमुळे या स्पर्धेत समावेश होणार आहे.

आतापर्यंत गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी, माजी अध्यक्ष राजनाथ सिंह, राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते अरुण जेटली आदी नेते पंतप्रधान पदाच्या स्पर्धेत आहेत. माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवानी हे देखील स्पर्धेत असल्याचा भाजपमधील एका गटाचा दावा आहे.

Leave a Comment