समाजशास्त्रांचा प्रगत अभ्यास

ss

सध्या सगळीकडेच विज्ञान, तंत्रज्ञान, प्रशासन आणि व्यवस्थापन यांच्या अभ्यासाला उधाण आले आहे. त्यातल्या त्यात तंत्रज्ञानविषयक अभ्यासक्रम आणि त्याच्याशी संबंधित नोकर्‍या, करिअर यांना महत्व आलेले आहे. या सगळ्या कोलाहाला-मध्ये समाजशास्त्राकडे दुलर्क्ष होत आहे. भौतिक शास्त्रांकडे असे लक्ष देताना समाज शास्त्रांची उपेक्षा करून चालणार नाही. अर्थशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र यांच्याशी निगडित असलेल्या अभ्यासक्रमांना गती दिली पाहिजे. मात्र विद्यापीठे सुद्धा ज्या शास्त्रांची चलती आहे त्यांचेच अभ्यासक्रम सुरू करत आहेत. उत्तर प्रदेशातील अलाहाबादच्या युनिव्हर्सिटी ऑफ अलाहाबाद या विद्यापीठाशी संलग्न असलेल्या पंडित गोविदवल्लभ पंत सोशल सायन्स इन्स्टिट्यूट या संस्थेने मात्र समाजशास्त्रांच्या अभ्यासाला आणि संशोधनाला महत्व देण्याचे ठरवले आहे.

१९८० साली स्थापन झालेली ही संस्था अलाहाबाद जवळील झुसी येथे आहे. स्थापन झाल्यापासून ही संस्था दिल्लीच्या इंडियन कौन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च या संस्थेशी संलग्न होती. परंतु २००५ साली ती अलाहाबाद विद्यापीठाशी संलग्न झाली. सतत बदलत चाललेल्या समाज व्यवस्थेचा अभ्यास करणे आणि त्यातून निर्माण होणारी आव्हाने पेलण्यासाठी उपाय शोधणे हे या संस्थेचे उद्दिष्ट आहे, असे या संस्थेच्या स्थापनेच्या वेळी सांगण्यात आले होते आणि असे उपाय शोधायचे असतील तर त्या त्या वेळी होणार्‍या बदलांवर संशोधन करणे आवश्यक आहे असे या संस्थेचे मानणे आहे. या संस्थेमध्ये केली जाणारी संशोधने आणि त्यांचे निष्कर्ष केंद्र आणि राज्य सरकारांना कळवले जातात आणि त्या सरकारांनी त्या अनुरोधाने समाजामध्ये काही बदल करावेत किवा नवे कायदे करावेत अशी संस्थेची अपेक्षा असते. शेवटी सरकारला सुद्धा नवनवे कायदे करताना ते समाजाच्या स्थितीशी सुसंगत असतील याची काळजी घ्यावी लागत असते आणि समाजाच्या स्थितीचे नेमके ज्ञान अशा संस्थांच्या संशोधनातूनच प्राप्त होत असते. या संस्थेने सरकारच्या कर्तव्यांच्या अनुरोधाने काही विषय निश्चित केले असून अभ्यास आणि सशोधनात त्यावरच भर दिलेला आहे.

संस्थेच्या अभ्यासाच्या विषयांमध्ये विकासात्मक नियोजन, विकासात्मक धोरणे, पर्यावरण, सार्वजनिक आरोग्य, लोकसंख्या, ग्रामीण विकास, समाजकल्याण, दारिद्र्य निर्मूलन, भूमी सुधारणा, संस्कृती, प्रशासन आणि लोकशाही या विषयांचा समावेश असतो. त्यांच्याशी संबंधित असलेले संदर्भ जमा करण्याचे कामही या संस्थेने केलेले आहे आणि भारतीय संस्कृतीच्या विविध पैलूंचे दर्शन घडविणारी प्रदर्शनेही या संस्थेने भरवली आहेत. या प्रदर्शनांमध्ये आदिवासींच्या संस्कृतीचे दर्शन प्राधान्याने घडावे हा हेतू समोर ठेवण्यात आलेला आहे. या संस्थेतील संशोधनाचा समाजाला उपयोग होणार असल्यामुळे या अनुरोधाने काम करणार्‍या काही शासकीय आणि निमशासकीय तसेच शासनाधिष्ठित संस्थांशी तिचा नित्य संपर्क असतो. त्यामध्ये नियोजन आयोग, युनिसेफ, जागतिक बँक, रॉयल ट्राऊपिकल इन्स्टिट्यूट अॅमस्टरडॅम, जागतिक कामगार संघटना, भारत सरकारचे विज्ञान आणि तंत्रज्ञान खाते, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि विविध राज्य सरकारांची सांख्यिकी कार्यालये यांचा समावेश होतो. या संस्थेमध्ये या विषयांशी निगडित अनेक प्रकारचे अभ्यासक्रम आहेत आणि त्या अभ्यासक्रमांमध्ये पदवीपासून डॉक्टरेटपर्यंत सर्व प्रकारच्या शिक्षणाची सोय आहे. समाज शास्त्रांशी निगडित संशोधन करण्याची एवढी मोठी सुविधा भारतात तरी दुसरी कोठेही नाही.

ज्या समाजहितैषी तरुणांना आपल्या अभ्यासाचा, हुशारीचा आणि संशोधनाचा समाजाला काही तरी उपयोग व्हावा असे वाटते त्यांनी या संस्थेत येऊन आपल्या आवडीच्या आणि तळमळीच्या विषयात जरूर संशोधन करावा. अधिक माहितीसाठी खालील पत्त्यावर संपर्क साधून अधिक माहिती प्राप्त करावी.  www.gbpssi.nic.in

Leave a Comment