संभ्रमित विद्यार्थ्यांसाठी

student

चांगले करिअर करावे आणि उत्तम पगाराची नोकरी मिळवावी, अशी इच्छा नसणारा विद्यार्थी कोणी असेल का? प्रत्येकाला तशी इच्छा असते. कारण त्याच्या अवती भवती विविध क्षेत्रात शिक्षण घेऊन मोठ्या पगाराच्या नोकर्‍या मिळवणारे अनेक लोक त्याला दिसत असतात. असे लोक ज्या पदव्या मिळवतात त्या पदव्या आपण मिळवल्या की आपणही असे छान करिअर करू शकतो अशी बहुतेक विद्यार्थ्याची कल्पना असते. मात्र त्यात यश आले नाही किंवा त्यासाठी थोडीशी वाट पहावी लागली की, तशी वाट पाहण्यासही विद्यार्थी तयार नसतात आणि ते अशी नोकरी मिळाली नाही की निराश होतात. असा प्रकार माहिती तंत्रज्ञानात फार घडताना दिसतो. या क्षेत्रामध्ये प्रवेश करून चांगल्या करिअरच्या वाटा मोकळ्या होईनाशा झाल्या की, यातले काही विद्यार्थी तर हे क्षेत्र पूर्णपणे बदलून एम.बी.ए.कडे वळतात. मात्र माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सामान्य नोकरी करण्यात आणि वाट पाहण्यात बरीच वर्षे गेलेली असतात आणि आता वाढत्या वयामध्ये एम.बी.ए. करणे योग्य ठरेल की नाही, अशीही शंका मनामध्ये दाटून येत असते. म्हणून अशा लोकांना काही गोष्टी सांगण्याची गरज आहे.

आपल्याला उत्तम करिअर करणारे लोक दिसतात खरे, परंतु त्यांनी केलेली तपश्चर्या आपण पहात नसतो. विशेषतः अशा लोकांनी त्या पदावर पोचेपर्यंत किती धक्के सहन केलेले असतात याची आपल्याला माहिती नसते. सब्र का फल मिठा होता है ही उक्ती लक्षात ठेवली पाहिजे आणि डोळ्यासमोर ठेवलेले उद्दिष्ट अतिशय चिकाटीने प्राप्त केले पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला त्या क्षेत्रात करिअरच करायचे असेल तर त्या क्षेत्रातील प्रगत अत्याधुनिक ज्ञान सतत प्राप्त करत राहिले पाहिजे. म्हणजे करिअरच्या नवनव्या वाटा आपल्यासाठी मोकळ्या व्हायला लागतात. विशेषतः माहिती तंत्रज्ञानामध्ये केवळ पदवी आहे म्हणून करिअर करता येईल अशी काही खात्री देता येत नाही. पदवीच्या सोबत एखादा उपयोजित अभ्यासक्रम पूर्ण केला पाहिजे आणि असे अभ्यासक्रम कोणते, ते कोठे करता येतील यावरही लक्ष ठेवले पाहिजे. माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात तर अशा अनेक अभ्यासक्रमांची रेलचेल आहे. त्यांच्यावर सातत्याने लक्ष ठेवावे लागते. कोणत्याही परिस्थितीत आपण ठरवलेले क्षेत्र बदलणार नाही, असा निर्धार करायला हवा. अडचणी येतील, वाट पहावी लागेल परंतु अडचणींवर मात करून आणि वाट पाहू असे मनाशी नक्की करायला हवे.

माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये अगदी वरच्या स्तरावर जाऊन पोचण्यामध्ये अजून एक अडचण आहे आणि ती म्हणजे मंदी. काही वेळा आपल्याकडे अत्याधुनिक ज्ञान असते, संधीही मिळालेली असते परंतु नेमके आपल्या हाताशी वरचे पद येत असतानाच मंदीची लाट येते आणि पदांची भरती बंद होऊन जाते. अशावेळी आपला काहीही इलाज चालत नाही. मंदीची लाट ओसरण्याची वाट पाहण्याशिवाय आपल्या हातात काहीही नसते. मात्र मंदीची लाट ही कधी ना कधी ओसरणारच असते हे लक्षात ठेवून थोडे धीराने घ्यावे लागते.

Leave a Comment