निवडक पोलिसांना स्कॉटलंड यार्डकडून प्रशिक्षण

मुंबई दि.४ – अल कायदा आणि लष्कर ए तय्यबा यासारख्या अतिरेकी संघटनांची नजर अजूनही मुंबईवर रोखलेली असून मुंबईवर पुन्हा हल्ला करण्याच्या अनेक योजना तेथे शिजत आहेत असा इशारा देणारा अहवाल लष्कर गुप्तवार्ता विभागाने महाराष्ट्र राज्य गृहमंत्रालयाला दिला आहे. गृहमंत्रालयानेही याची तातडीने आणि गंभीर दखल घेतली असून मुंबई गुन्हा अन्वेषण विभागातील निवडक १७ अधिकार्‍यांना लंडनच्या सुप्रसिद्ध स्कॉटलंड यार्डकडून प्रशिक्षण देण्यात आले आहे असे समजते.

लष्कराच्या गुप्तवार्ता विभागाने दिलेल्या अहवालानुसार दहशतवादी संघटना मुंबईतील सिनेकलाकार, राजकारणी नेते आणि उंच इमारतीत काम करणार्‍या नागरिकांना ओलीस धरण्याच्या योजना आखत आहेत. अशी परिस्थिती उद्भवलीच तर हे प्रशिक्षित अधिकारी ही आणीबाणीची वेळ कमांडो येईपर्यंत चोख हाताळतील अशी खात्रीही व्यक्त करण्यात येत आहे. तसेच दहशतवादी हल्ला झालाच तर नागरिकांनी काय करावे यासाठी नवीन पोलिस उपायुक्तासह पोलिसांची पथके जनजागरण मोहिमा राबवित आहेत असेही समजते.

मुंबई पोलिस उपायुक्त निसार तांबोळी यांनीही अधिकार्‍यांना स्कॉटलंड यार्डकडून प्रशिक्षित करण्यात आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

Leave a Comment