तिसर्‍यांदा त्रिफळा उडाल्यावर संतापला सचिन

बंगळुरू दि. ४ – न्यूझीलंडविरूद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरचा बचाव सलग तीनवेळा भेदला गेला . सचिनचा तीनवेळा त्रिफळा उडाला आणि तो संतप्त झाला. आपली बॅट त्याने रागाने स्टंपच्या दिशेने उगारली. मात्र लगेचच राग शांत केला.

हैदराबादेत पहिल्या सामन्यातील पहिल्या डावात क्लिनबोल्ड झाल्यानंतर दुसर्‍या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी कीवी गोलंदाज टिम साउथीने दुसर्‍या डावात तेंडुलकरची मधली दांडी उडविली. अर्थात, हे काही पहिल्यांदा घडले नाही. २००२ मध्ये सचिन इंग्लडविरूद्धच्या कसोटी मालिकेतही सलग तीनवेळा बोल्ड झाला होता.

जगभर विक्रम, उत्तम तंत्र आणि एकाग्रतेसाठी प्रसिद्ध असलेल्या तेंडुलकरसाठी दोन कसोटींची मालिका फार निराशाजनक राहिली. हैदराबादेत तो १९ धावांवर असताना ट्रेंट बोल्टने त्याला बोल्ड केले. दुसर्‍या कसोटीतही असेच घडले. या सामन्याच्या पहिल्या डावात डग ब्रेसवेलने तेंडुलकरचा बचाव भेदला. दुसर्‍या डावातही साउथीचा चेंडू सचिनच्या पॅडला लागून यष्टीवर आदळला. तेंडुलकर तेव्हा अक्रॉस द लाइन खेळत होता. मात्र त्याचाही त्याला फायदा झाला नाही.

दोन दिवसांपूर्वी लिटिल मास्टर आणि एकेकाळचे दिग्गज सलामी फलंदाज सुनील गावस्कर यांनाही वाटले की, सचिनच्या फलंदाजीवर वयाचा प्रभाव जाणवत आहे. सचिनचे फुटवर्क आता पहिल्यासारखे राहिले नाही, असे गावस्करांचे म्हणणे होते.

तेंडुलकरने आतापर्यंत १९० कसोटी सामन्यात ५५.०८ च्या सरासरीने १५५३३ धावा केल्या आहेत. तो कसोटी क्रिकेट सामन्यात ५१ वेळा बोल्ड झालेला आहे. बोल्ड होण्याचा रेकॉर्ड राहुल द्रवित्रडच्या नावावर असून तो ५५ वेळा बोल्ड झाला आहे. त्यानंतर अॅलन बॉर्डर (५३) चा क्रमांक लागतो.