वाडिया उद्योगसमुहाचे वाहन उद्योगावर अधिक लक्ष

मुंबई दि.३ – पावणेतीनशे वर्षांहूनही अधिक काळ व्यवसायात असलेल्या वाडिया उद्योगसमुहाने गेल्या वर्षापासून आपले अनेक उद्योग बंद करून कांही ठराविक उद्योगांवरच अधिक लक्ष केंद्रीत करण्याचे ठरविले आहे. गतवर्षी तीन उद्योगांतून बाहेर पडल्यानंतर आता त्यांनी इंजिनिअरिंग उद्योगातूनही बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असून फायदेशीर असलेल्या वाहनउद्योगावरच सारे लक्ष केंद्रीत करण्याचे ठरविले आहे. गेरझी इस्ली ही पन्नास वर्षे जुनी डिझाइन इजिनिअरिंग फर्मही बंद करण्यात येत असून १०० कोटींचा व्यवसाय असलेल्या या फर्मने रिलायन्स आणि सिमेन्ससारख्या कंपन्यांचे काम केले आहे. कंपनीचे अध्यक्ष नुस्ली वाडिया यांनी आपल्या दोन भावात म्हणजे नेस आणि जेह वाडिया यांच्यात व्यवसायाच्या वाटण्या केल्या आहेत असेही समजते.

इलेक्ट्रोमॅग ऑटो ही वाडिया समुहाची कंपनी अतिशय फायदेशीर कंपनी आहे. तिचे बॉम्बे बर्मा ट्रेडिंग कार्पोरेशनमध्ये विलीनीकरण करण्यात येत असून त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या कंपनीची मालकी नेस वाडिया यांच्याकडे आहे. जेड वाडिया यांनी बॉम्बे डाईंग या कंपनीचे रूपांतर आता रियल इस्टेट कंपनीत केले आहे. या कंपनीतर्फे अनेक मॉल्स, हॉटेल्स आणि निवासी इमारती बांधण्यात येत आहेत. बॉम्बे बर्मा ही १४२ वर्षे जुनी कंपनी भारतातील दुसरी लिस्टेट कंपनी आहे. त्यांनी त्यांच्या कंपनीचा कांही हिस्सा जपान आणि जावा मधील कंपन्यांना विकला असून एकूण ११५ कोटी रूपयांना ही विक्री करण्यात आली असल्याचेही सांगण्यात येत आहे.