
ज्ञान-विज्ञानाच्या कक्षा जसजशा रुंदावत आहेत तसतसे नवेनवे करिअर क्षेत्र निर्माण होत आहेत. इंजिनिअरींग आणि मेडिकल अशी दोन क्षेत्रे आपण जाणतोच. पण या दोन्हींची मिळून एक तिसरी शाखा तयार झालेली आहे ती म्हणजे बायोमेडिकल इंजिनिअरींग. वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असलेला डॉक्टर हा रुग्णांची प्रकृती तपासू शकेल, परंतु तपासणी करण्यासाठी लागणारी जी अनेक यंत्रे असतात त्या यंत्रांची निर्मिती डॉक्टर करू शकणार नाहीत. कारण ते काम इंजिनिअरचे असते. इंजिनिअर डॉक्टरांना लागणारे यंत्र तेव्हाच विकसित करू शकेल जेव्हा त्याला वैद्यकीय शास्त्राची पुरेशी माहिती असेल. म्हणून डॉक्टरांना लागणार्या साधनांचा विकास, निर्मिती आणि देखभाल या कामांसाठी म्हणून वैद्यकीय आणि अभियांत्रिकी या दोन्हीही शाखांचा मिलाप घडवून बायोमेडिकल इंजिनिअरींग हे शास्त्र आणि विद्या शाखा विकसित करण्यात आली आहे.
