पाकिस्तानी संपादकाला धर्मवेड्यांकडून मारहाण

इस्लामाबाद दि.३ – पाकिस्तानातील प्रमुख इंग्रजी वृत्तपत्र न्यूज डेलीचे संपादक झैनुल अबेदिन यांना चार धर्मवेड्यांनी त्यांच्या घराबाहेर टिव्ही पाहिला आणि कवाली ऐकली या कारणावरून बेदम मारहाण केल्याचे वृत्त आहे. २७ ऑगस्टला घडलेल्या या घटनेनंतर अबेदिन यांनी पोलिसांत तक्रार नोंदवूनही पोलिसांनी मारहाण करण्यार्‍यांविरूद्ध अद्यापी कोणतीही कारवाई केलेली नाही असे समजते.

याविषयी मिळालेल्या माहितीनुसार अबेदिन त्यांच्या गुलशन ई इक्बाल या परिसरातील घरात टिव्ही पाहात होते आणि कव्वाली ऐकत होते तेव्हा रात्री ११ च्या सुमारास चार जणांनी त्यांच्या घराचा दरवाजा लाथा मारून उघडला आणि अबेदिन यांना शिवीगाळ सुरू केली. अबेदिन यांनी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा या चौघांनी त्यांना घराबाहेर नेऊन त्यांना लाथा घातल्या, चष्मा फोडला व बेदम मारहाण केली. टिव्ही पाहायचा नाही आणि संगीत एकायचे नाही अशी ताकीदही त्यांनी यावेळी दिली तेव्हा अबेदिन यांनी माझ्या घरात मी काय करायचे हे तुम्ही सांगू नका असे म्हणताच त्यांना पुन्हा मारहाण करण्यात आली आणि मारहाण करणार्‍यांनी घरात घुसायचा प्रयत्न केला मात्र अबेदिन यांच्या बहिणीने दरवाजा लावून घेतला. अबेदिन यांना माफी मागायला लावण्यात आली.

यावर अबेदिन यांनी पोलिसांत तक्रार दिली मात्र त्याचा कोणताही उपयोग झाला नाही. या वस्तीत हे धर्मवेडे सर्वच नागरिकांना अशा धमक्या देत असल्याचे समजते.

Leave a Comment