‘गँग्ज ऑफ वासेपूर -२’

बॉलिवूडमध्ये सध्या सिक्वेल काढण्याचा सपाटा सुरू आहे. त्यातील बहुतांश व्यावसायिक यश मिळेल या आशेने काढण्यात आलेले होते. मात्र खर्या अर्थाने सिक्वेल असलेला ‘गँग्ज ऑफ वासेपूर -२’ प्रेक्षकांना पहिल्या भागा एवढाच भावेल यात शंका नाही. स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरू झालेली ही कथा पहिल्या भागात १९८५ पर्यंत आली होती. आता त्यानंतरच्या कहाणी अनुरागने आपल्या समोर आणली आहे.

‘गँग्ज ऑफ वासेपूर -२’ ची कथाही पहिल्या भागाप्रमाणेच नायकाच्या वडिलांच्या खुनानंतर सुरू होते. कोळसा खाणीतील कामगारांच्या जिवावर बाहुबली झालेल्या रामधिरसिंहने सरदार खानचा पिता शाहिद खान, सरदार आणि त्याच्या मोठ्या मुलाला मारले आहे. दानिशचा मृत्यू झाल्यामुळे घराची जबाबदारी फैजलच्या खांद्यावर आहे. मात्र, व्यसनाधीन असलेला फैजलला (नवाजुद्दीन सिद्दीकी) त्याची जाणीव नाही. त्याच्या आईने त्याच्या मर्दानगीला डिवचल्यानंतर फैजल जागा होतो आणि सरदार खानचा व्यवसाय पुढे चालवू लागतो. मात्र, खानदानी दुश्मनीमुळे त्याला स्वच्छ प्रतिमेने व्यवसाय करता येत नाही. त्यामुळे पुन्हा एकदा गँगवॉर होणार हे निश्चित होते.

फैजलच्या गँगमध्ये असलेला परपेंडिकुलर दुधारी ब्लेड चालवण्यात एक्सपर्ट आहे. त्याच्या मित्राचे नाव टॅनजेंट आहे. परपेंडिकुलर सरदार खानचा सर्वात लहान मुलगा आहे. सरदारची दुसरी पत्नी दुर्गाचा मुलगाही आता मोठा झाला आहे, त्याचे नाव डेफिनेट असे आहे. फैजल खान आपल्या वडिलांच्या हत्यार्याचा खून करतो. ज्या कू्ररपणे तो त्याला संपवतो त्यामुळे फैजलच्या नावाचा दबदबा वासेपूर आणि धनबादमध्ये निर्माण होतो. त्याची दहशत लक्षात घेऊन रामधिरसिंह त्याच्याशी मांडवली करतो, अर्थात यात दोघांचाही स्वार्थ दडलेला आहे. या कथित मैत्री नंतर पुढे काय होते हे जाणून घेण्यासाठी गँग्ज ऑफ वासेपूर -२ चित्रपटगृहात जाऊनच पाहायला हवा.

धनबाद जवळ वसलेले वासेपूर आता एक छोटे गाव राहिलेले नाही. बिहार विभाजनानंतर वासेपूर हे गाव झारखंडचा भाग बनला असून धनबादजवळच्या शहरात त्याचे रूपांतर झाले आहे. याच काळात तंत्रज्ञान बदलत गेले, लँडलाईनच्या जागी पेजर आला पुढे मोबाईल आला, या छोट्या – छोट्या गोष्टीमधूनही अनुराग आपल्याला कथेत बदलत जाणार्या काळाची जाणीव करत जातो. चित्रपटात दिसणार्या गाड्याही काळानुरूप बदलत गेल्या आहेत. नव्वदच्या दशकातील सामाजिक, राजकीय, आर्थिक अशी सर्व महत्त्वपूर्ण स्थित्यंतरे प्रेक्षकांना ‘गँग्ज ऑफ वासेपूर -२’ मध्ये अनुभवायला मिळतात.

पारंपरिक हिरोच्या व्याख्येत कुठेही न बसणार्या नवाजुद्दीन सिद्दीकीने आपली भूमिका उत्कृष्टपणे साकारली आहे. नवाजुद्दीनमधील वाखाणण्याजोगी गोष्ट म्हणजे त्याचा सामान्य माणसाचा लूक आणि जबरदस्त बॉडी लँग्वेज. व्यसनाधीन मुलगा, अमिताभ बच्चनचा फॅन, रंगीला प्रियकर ते शांतपणे विचार करून क्रूर असे काम करणारा गँगस्टर त्याने आपल्या अभिनयाच्या प्रतिभेतून साकार केला आहे. त्याला चित्रपटातील प्रत्येक कलाकाराने दिलेली साथ तेवढीच बहुमोल आहे. चित्रपटातील प्रत्येक व्य्नतीरेखाची निवड अनुरागने अचूक केली असल्याचे दिसते.

चित्रपटाची मूळ कथा खूपच दमदारच आहे, त्याला उत्कृष्ट संवाद आणि दृश्यांमुळे एक अनोखा साज मिळाला आहे. बदलत गेलेला काळा कॅमेर्यात उत्कृष्टपणे कैद केला आहे. हा चित्रपट पहिल्या भागापेक्षा जास्त र्नतरंजीत, उत्कंठावर्धक आणि मनोरंजक आहे. कोणत्याही स्टार कलाकारांना न घेता एक वेगळा विषय हाताळण्याच्या अनुरागच्या हिमतीला दाद द्यायलाच हवी.

Leave a Comment