आणखी एका संशयित दहशतवाद्याला अटक

बंगलोर दि.३ – संशयित दहशतवादी अटक सत्रात आज कर्नाटक गुन्हा अन्वेषण विभागाने आणखी एकाला अटक केली. डॉक्टर सिद्दिकी असे त्याचे नाव असून तो दहशतवादी संघटनासाठी भरती करण्याचेही काम करत होता असे पोलिसांनी सांगितले. सिद्दीकीच्या अटकेनंतर पकडण्यात आलेल्या संशयितांची संख्या १८ झाली आहे. पैकी ११ जणांना बंगळूर येथून व हुबळी येथून गुरुवारी पकडण्यात आले आहे. एका विद्यार्थ्याला हैद्राबाद येथे तर अन्य चार जणांना नांदेड येथे अटक करण्यात आली आहे.

सिद्दीकीकडून लोपटौप, फोन व रोकड जप्त करण्यात आली असून पूर्वी अटक करण्यात आलेल्या संशयितांकडून मिळालेल्या माहितीवरून त्याला रविवारी रात्री दावणगिरे येथून ताब्यात घेण्यात आले. चौकशीत तो दहशतवादींची भरती करण्याचे काम करत होता तसेच त्यांच्या कारवायासाठी पैसे पुरवत होता असे निष्पन्न झाले आहे. अटक करण्यात आलेल्या अन्य संशयीतांशी त्याचा संपर्क होता. रविवारी पहाटे इंग्रजी पेपरचा पत्रकार असलेल्या मोहम्मद अक्रम यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

दहशतवादी संशयिताची धरपकड कर्नाटक,आंध्र आणि महाराष्ट्रात सुरू असून संरक्षण आणि अणु प्रकल्पावर हल्ले चढविण्याचा हा कट सौदी अरेबियात शिजला होता असेही पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.