भारताकडून किवी संघाला व्हाईट वॉश

बंगळूरू: दुसरा कसोटी क्रिकेट सामनाही जिंकून भारताने दोन सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलण्डला व्हाईट वॉश दिला. विराट कोहलीला मॅन ऑफ द मॅच तर मालिकेत सर्वाधिक १८ बळी घेणारा फिरकी गोलंदाज आर. अश्विन याला मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार देण्यात आला.

भारताच्या दुसर्‍या डावात विराट कोहली (५१), चेतेश्वर पुजारा (४८), कर्णधार महेंद्रसिंग धोनी (४८) या फलंदाजांनी भारताला विजयाच्या समीप नेले. त्यापूर्वी वीरेंद्र सहवाग (३८), गौतम गंभीर (३४) आणि सचिन तेंडुलकर (२७) यांनी फलंदाजी केली. धोनीने षटकार ठोकून विजय साकारला.

दुसर्‍या डावाच्या सुरुवातीला सामन्यावर गोलंदाजांचेच वर्चस्व राहिले. किवी गोलंदाजांनी भारताचा निम्मा संघ १६६ धावात तंबूत पाठविला. त्यानंतर विराट कोहली आणि धोनी यांनी सुरुवातीला संयमी आणि जम बसल्यावर आक्रमक खेळाचे दर्शन घडविले.

त्या आधी सुरेश रैना भोपळा न फोडताच परत आला. पुजारालाही जितेन पटेलने माघारी धाडले. त्यानंतर भारतीय संघ काहीसा दडपणाखाली आला. त्यातच पावसानेही खेळात विघ्न आणले. सचिन सलग तिसर्‍यांदा त्रिफळाचित झाला.

मात्र किवी संघाला सलग दुसर्‍यांदा पराभूत करण्याची किमया साधण्यात भारतीय संघाने अखेर यश मिळविले.

Leave a Comment