बायोमेडिकलचे व्यापक क्षेत्र

ज्ञान-विज्ञानाच्या कक्षा जसजशा रुंदावत आहेत तसतसे नवेनवे करिअर क्षेत्र निर्माण होत आहेत. इंजिनिअरींग आणि मेडिकल अशी दोन क्षेत्रे आपण जाणतोच. पण या दोन्हींची मिळून एक तिसरी शाखा तयार झालेली आहे ती म्हणजे बायोमेडिकल इंजिनिअरींग. वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असलेला डॉक्टर हा रुग्णांची प्रकृती तपासू शकेल, परंतु तपासणी करण्यासाठी लागणारी जी अनेक यंत्रे असतात त्या यंत्रांची निर्मिती डॉक्टर करू शकणार नाहीत. कारण ते काम इंजिनिअरचे असते. इंजिनिअर डॉक्टरांना लागणारे यंत्र तेव्हाच विकसित करू शकेल जेव्हा त्याला वैद्यकीय शास्त्राची पुरेशी माहिती असेल. म्हणून डॉक्टरांना लागणार्‍या साधनांचा विकास, निर्मिती आणि देखभाल या कामांसाठी म्हणून वैद्यकीय आणि अभियांत्रिकी या दोन्हीही शाखांचा मिलाप घडवून बायोमेडिकल इंजिनिअरींग हे शास्त्र आणि विद्या शाखा विकसित करण्यात आली आहे.

हे शास्त्र अलीकडच्या काळात चांगलेच लोकप्रिय झाले असून, त्या शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढत आहे. या शाखेचे शिक्षण घेतलेले पदवीधर आणि तंत्रज्ञ अनेक प्रकारांनी डॉक्टरांना उपयुक्त असे काम करू शकतात. सध्याच्या वैद्यकीय व्यवसायामध्ये निरनिराळ्या प्रकारच्या साधनांचा वापर वाढत चाललेला आहे. त्यामुळे एखाद्या दवाखान्यामध्ये अशी साधने जितकी जास्त असतील तितका त्या दवाखान्याकडे रुग्णांचा ओढा असतो. म्हणून अशा रुग्णालयात डॉक्टरांच्या इतकेच बायोमेडिकल इंजिनअर्स आणि परिचारिकांइतकेच बायो मेडिकल तंत्रज्ञ आवश्यक ठरायला लागले आहेत. या कामाचे स्वरूप दोन प्रकारचे आहेत. पहिल्या प्रकारात साधनांचा विकास आणि संशोधन येते, तर दुसर्‍या प्रकारात दुरुस्ती आणि देखभाल या गोष्टी येतात.

ही पदवी घेणार्‍या विद्यार्थ्याला वैद्यकीय शाखेचेही ज्ञान असते आणि अभियांत्रिकी शाखेचेही तेवढेच ज्ञान असते. त्यामुळे वैद्यकीय निदानासाठी म्हणून नवनवी साधने शोधून काढून ती विकसित करण्याचे काम संशोधक बुद्धी असलेला बायोमेडिकल इंजिनअर करू शकतो. किंवा अशा प्रकारची साधने विकसित करण्यासाठी स्थापन झालेल्या एखाद्या संस्थेत तो संशोधक म्हणून नोकरी करू शकतो. परंतु प्रत्येकच विद्यार्थ्यांमध्ये संशोधक बुद्धी असतेच असे नाही. असा विद्यार्थी विविध रुग्णालयांमध्ये असलेल्या साधनांची देखभाल आणि दुरुस्ती करण्याची नोकरी मिळवू शकतो. दवाखान्याचे चित्र आज किती बदललेले आहे हे आपण पहातच आहोत. त्यामुळे बायोमेडिकल इंजिनिअर्सची गरजही वाढत चालली आहे. आज देशातल्या बर्‍याच अभियांत्रिकी महाविद्यालयांनी या शाखेचे शिक्षण द्यायला सुरुवात केलेली आहे. विज्ञान शाखेची बारावीची परीक्षा दिल्यानंतर अखिल भारतीय स्तरावरच्या प्रवेश परीक्षा देऊन या शाखेला प्रवेश मिळविता येतो.