चुकत चुकत इंग्रजी शिकविणारा रोबो मास्तर

पोहोणारा रोबो आणि महिला रोबो रेस्टॉरंट सुरू करणार्‍या जपानी संशोधकांनी मुलांना सतत चुका करत करत इंग्रजी शिकविणारा रोबो तयार केला आहे. त्सुकुबा विद्यापीठातील शिसुफो आणि फ्युनिहाई या दोन संशोधकांनी हा रोबो तयार केला असून त्याच्या अनेक चाचण्याही घेण्यात आल्या आहेत.

हा रोबो बनविताना मुलांच्या मानसिकतेचा अचूक अंदाज या संशोधकांनी घेतला आहे आणि मुलांना नक्की काय आवडेल याचा विचारही केला आहे. चार ते आठ वयोगटातील मुलांचा या निओ रोबोशी कसा संवाद होतो याचा मोठा मनोरंजक अनुभव त्यांना आला आहे. रोबोने खेळांच्या माध्यमातूनच मुलांना इंग्रजीची ओळख करून द्यावी असा प्रयत्न त्यासाठी केला गेला आहे. सर्कल, स्क्वेअर, हार्ट, क्रिसेंट असे शब्द सांगताना त्याची आकृती काढली गेली तर मुलांना हे शब्द अधिक चांगले लक्षात राहतात असेही यात लक्षात आले. हा रोबो दिसायला अशक्त आणि नाजूक आहे पण तो मुलांशी संवाद साधतो तेव्हा मुले त्याच्यात गुंततात आणि त्याची अधिक काळजी घेतात असेही संशोधकांना आढळले. तसेच मुलांनी सर्कल म्हटले तर रोबो मुद्दाम चुकीचा आकार काढतो पण मुलेच त्याचा हात धरून बरोबर आकार काढून त्याला दाखवितात. आपल्याला उत्तरे माहिती नाहीत असा आव हा रोबो आणतो तेव्हा त्याला शिकविण्यासाठी मुले अधिक काळजीपूर्वक शब्द शिकतात असेही आढळून आले आहे.

सप्टेंबरमध्ये जपानमध्ये होत असलेल्या रो मेन या आंतरराष्ट्रीय रोबो – मानव संवाद परिषदेत या रोबोचे सादरीकरण केले जाणार आहे.

Leave a Comment