मेटलर्जीचे अभ्यासक्रम

metमेटलर्जी म्हणजे धातूशास्त्र. धातूशास्त्र हा विषय घेऊन बी.एस्सी. ही पदवी घेता येतेच, पण आय.आय.टी.मध्येही मेटलर्जीच्या अभ्यासक्रमाची सोय करण्यात आलेली आहे. सध्याच्या काळामध्ये मेटलर्जीला मोठी संधी निर्माण झालेली आहे. कारण देशाची औद्योगिक प्रगती मोठ्या वेगाने होत आहे.

बांधकामांपासून ते अंतराळ संशोधनापर्यंत सर्व प्रकारच्या उद्योगात निरनिराळ्या प्रकारचे धातू आणि मिश्रधातू वापरले जात असतात आणि त्यांची निर्मिती करण्याचे कसब जाणणारे तज्ज्ञ मोठ्या प्रमाणावर लागत असतात. ज्या कंपन्यांमध्ये निरनिराळे धातू प्राप्त केले जातात त्या कंपन्यांत मेटलर्जीस्ट यांना मोठ्या नोकर्‍या मिळतात.

आपल्या देशामध्ये काही उद्योगांना काही विशिष्ट धातू लागतात आणि सरकारने त्या उद्योगांनाच त्यांना आवश्यक असलेले कच्चे धातू उत्खनन करून काढण्याचे परवाने दिलेले आहेत. अशा कंपन्या स्वतःच धातूचे शुद्धीकरण करून घेत असतात आणि त्यांना मेटलर्जीस्ट मोठ्या प्रमाणावर लागतात. भारतातल्या काही कंपन्यांमध्ये मेटलर्जीस्ट कमी पडत असल्यामुळे ते सतत त्यांची मागणी करत असतात.

टाटा स्टील, भारतीय पोलाद प्राधिकरण, नाल्को, स्पाँज आयर्न इंडिया लि., हिंदुस्थान कॉपर लि., राष्ट्रिय ताप बिजली निगम, राज्याराज्यातली वीज मंडळे, इलेक्ट्रोनिक्स बोर्ड, अंतराळ संशोधन संघटना, संरक्षण संशोधन आणि विकास संघटना आणि रेल्वे अशा देशातल्या मोठमोठ्या संस्थांना मेटलर्जीस्ट मोठ्या प्रमाणावर लागत असतात. नोकरीवर घेताना या कंपन्या पदवीधरांना प्रशिक्षणार्थी म्हणून दाखल करून घेतात आणि त्यांची भरती प्रक्रिया सुरू करण्यासाठी राष्ट्रिय वृत्तपत्रांमध्ये जाहिराती दिलेल्या असतात. एक लेखी परीक्षा आणि तोंडी मुलाखत अशी निवडीची पद्धत असते.

मात्र मेटलर्जीस्टांना नोकर्‍या देणार्‍या संस्था अनेक आहेत, त्यांच्या कामांचे स्वरूप भिन्न भिन्न आहे. त्यामुळे त्यांच्या भरतीच्या प्रक्रियेत सुद्धा थोडाबहुत फरक असू शकतो. तो जाणून घेण्यासाठी त्या त्या संस्थेच्या, संघटनेच्या संकेतस्थळाशी संफ साधला पाहिजे. अशा पदवीधरांना सेफ्टी इंजिनिअर्स, क्वॉलीटी प्लॅनिग इंजिनिअर, प्लँट इक्विपमेंट इंजिनिअर, रिसर्चर अॅन्ड कन्स्लटंट अशा पदांवर घेतले जाते. मेटलर्जीस्ट या तंत्रज्ञांना मागणीही भरपूर आहे आणि त्यांना वेतनही आकर्षक स्वरूपात दिले जाते. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, या लोकांचे काम मोठे आव्हानात्मक असते. कारण भारतामध्ये धातूशास्त्राचे संशोधन फार झालेले नाही. विशेषतः मिश्रधातूंच्या बाबतीत भारत फार मागे आहे आणि भारताचे अनुमोल परदेशी चलन मिश्रधातूंची आयात करण्यावर खर्च होत असते. ते टाळण्याचे आव्हान मेटलर्जीस्टांवर आहे.