निवासी इमारती ’हेरिटेज’ करू नका : उद्धव ठाकरे

मुंबई, १ सप्टेंबर -दादरचा देखणा शिवाजी पार्क परिसर हेरिटेज म्हणून घोषित करणार असाल तर तिथल्या पन्नास-पाऊणशे वर्षं जुन्या इमारती हेरिटेज वास्तू सदरातून वगळाव्यात, अशी आग्रही मागणी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली आहे.

सुमारे ६०० ब्रिटिशकालीन इमारतींसह मुंबईतील ८५० इमारती व बांधकामांना ’हेरिटेज वास्तू’ दर्जा देण्याचा प्रस्ताव ’दि मुंबई हेरिटेज कॉन्झर्व्हेटिव्ह कमिटी’ ने तयार केला आहे. त्या अंतर्गत शिवाजी पार्क परिसरही ’हेरिटेज’ ठरणार असून तिथल्या शेकडो जुन्या इमारतींचा पुनर्विकास करणे अशक्य होणार आहे. त्यामुळे पार्कातल्या

पन्नास-पाऊणशे वर्षं जुन्या, टेकूच्या आधारावर उभ्या असलेल्या इमारतींमधील रहिवासी धास्तावले आहेत. हेरिटेज बंधनामुळे रहिवाशांना साधी घरदुरुस्ती, रंगरंगोटी करणे कठीण होऊ शकते. स्वाभाविकच, या प्रस्तावाला तिथल्या ’पारंपरिक’ रहिवाशांचा विरोध आहे.

शिवाजी पार्कवासियांची हीच भावना शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज मुख्यमंत्र्यांपुढे मांडली. काही वैशिष्ट्यपूर्ण, पुरातन वास्तूंचे जतन व्हायलाच हवे, पण निवासी इमारतींमध्ये राहणार्‍या हजारो कुटुंबांची गैरसोय होणार नाही, हेही पाहायला हवे, असे त्यांनी नमूद केले. मुंबईचा मेकओव्हर करण्याचे स्वप्न सरकारने दाखवले आहे.

त्यासाठी सीआरझेडची बंधने शिथिल केली, वाढीव एफएसआयच्या घोषणा केल्या आणि आता निवासी इमारतींना ’पुरातन’ संज्ञेत बसवून सर्व विकास थांबवण्याचे धोरण चमत्कारिक असल्याची टीका त्यांनी केली. शिवाजी पार्क, प्रभादेवी, माहीम परिसरातील इमारतींना हेरिटेज ठरवणार असाल, तर भेंडीबाजारातील इमारतींनाही हे निकष लावायला नकोत का ?, असा खोचक उद्धव यांनी केला.

शिवसेनेचे मुद्दे ऐकून घेतल्यावर, या प्रकरणी मुंबई महापालिकेच्या आयुत्त*ांशी चर्चा करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. दरम्यान, या ’हेरिटेज’ च्या प्रस्तावाविरोधात मनसेने आधीच मोहीम हाती घेतली आहे.

Leave a Comment