नरोडा हत्याकांड : माया कोडनानींना २८ वर्षांची शिक्षा, बजरंगीला मरेपर्यंत जन्मठेप

अहमदाबाद, १ सप्टेंबर -गुजरातमध्ये सन २००२ मध्ये झालेल्या नरोडा पाटिया हत्याकांडप्रकरणी दोषी धरलेल्या ३१ आरोपींना आज येथे विशेष न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. भाजपच्या माजी मंत्री व आमदार माया कोडनानी यांच्यासह बाबू बजरंगी यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. माया कोडनानी यांना कोर्टाने २८ वर्षांची तर बजरंगीला मृत्यूपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सात आरोपींना २१ वर्षाची जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली आहे. शिक्षा दुपारी पावणे चार वाजता जाहीर करण्यात आली. यावेळी कोर्ट परिसरात कडक सुरक्षा ठेवण्यात आली होती. नरोडात रॅपिड एक्शन फोर्सचे (आरएएफ) जवान पोहोचलेले आहेत. दोषी ठरवलेल्या सर्व लोकांवर हत्या, हत्येचा प्रयत्न, गुन्ह्याचा डाव रचणे, असे आरोप सिद्ध झाले आहेत.
गुजरातमध्ये झालेल्या या दंगलीतील नरोडा पाटिया हत्याकांडात कोर्टाने माया कोडनानी आणि बजरंग दलाचा नेता बाबू बजरंगी यांना दोषी ठरविले होते. त्यामुळे विरोधी पक्ष काँग्रेसने नरेंद्र मोदी यांचा राजीनामा मागितला आहे. भाजपने मोदींचा बचाव करताना या दंगलीत नरेंद्र मोदी यांचे नाव राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचे म्हटले आहे.
नरोडा पाटिया हत्याकांड प्रकरणाचा निकाल विशेष कोर्टाने बुधवारी सुनावला होता. कोर्टाने नरोडा पाटिया हत्याकांडप्रकरणी ३०० पेक्षा जास्त लोकांची साक्ष नोंदवण्यात आली होती. कोर्टाने या प्रकरणातील ६१ आरोपीपैकी ३२ जणांना शिक्षा सुनावली होती तर, २९ जणांना निर्दोष ठरवले होते. या हत्याकांडात ९७ लोक मृत्यूमुखी ठरले होते. या प्रकरणात एकूण ७० आरोपी होते. त्यातील ३ जण फरार आहेत तर ६ जणांचा मृत्यू झाला आहे.
२००२ मध्ये मानवाधिकार आयोग, अल्पसंख्यक आयोग आणि महिला आयोगाचे अहवाल आले होते. त्यात मोदी सरकारला दोषी धरले होते. ब्रिटिश सरकारचा अहवालही आला त्यात मोदी सरकारने दंगेखोरांना मदत केल्याचा आरोप केला होता. त्याच वर्षी (२००२) गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका होणार होत्या. दंगलीचा मुद्दा निवडणूकीत करण्यात आला. मात्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली भाजपने १८२ पैकी १२६ जागा जिंकल्या होत्या.
२००७ मध्येही सुप्रीम कोर्टाने नियुत्त* केलेल्या सक्सेना समितीचा अहवाल प्रसिद्ध झाला होता. त्यानंतर काही महिन्यात तहलकाने स्टिंग ऑपरेशन केले होते ज्यात म्हटले होते की, गुजरात दंगलीमध्ये मोदी सरकारचा हात आहे. त्याच वर्षी पुन्हा विधानसभेच्या निवडणुका झाल्या. दंगलीचा मुद्दा पुन्हा उपस्थित झाला तरीही भाजपने ११७ जागा जिंकत मोदी सरकार पुन्हा आरुढ झाले.

Leave a Comment