अनेक खाणी कोळसामंत्र्यांच्याच: सोमैय्या

मुंबई: कोळसामंत्री श्रीप्रकाश जयस्वाल यांनी आपल्याच बनावट कंपन्यांच्या नावाने खाण वाटप केले असून त्यांच्या शिफारसीवरून काँग्रेस खासदार विजय दर्डा यांनाही कोळसा खाण बहाल करण्यात आल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमैय्या यांनी केला.

संयुक्त पुरोगामी आघाडीच्या कार्यकाळात तब्बल २५ हजार कोटी रुपये किंमतीच्या कोळसा खाणींचे वाटप करण्यात आले असून ते बहुतांश बनावट कंपन्यांच्या नावावर करण्यात आले आहे. यापैकी बहुतेक कंपन्या जयस्वाल यांच्याच आहेत; असा सोमैय्या यांचा आरोप आहे. जयस्वाल यांच्यासह सुबोधकांत सहाय यांच्या राजीनाम्याची मागणीही त्यांनी केली.

कोळशाच्या व्यवसायात जयस्वाल आणि दर्डा हे भागीदार असून जयस्वाल यांच्या शिफारसीने दर्डा यांना ९ खाणी मिळाल्या. जयस्वाल यांच्या मालकीच्या बनावट कंपन्यांना खाणी वाटप करण्यात आल्या. त्यासाठी हवालामार्फत पैसा लावण्यात आला; असा सोमैय्या यांचा आरोप आहे.

दरम्यान; आपल्यावर सोमैय्या यांनी केलेले सर्व आरोप धादांत खोटे असून सोमैय्या यांनी ते सिद्ध केल्यास राजकारण सोडू; अशा शब्दात दर्डा यांनी सोमैय्या यांना अव्हान दिले आहे.