नवी दिल्ली: संसदेचे कामकाज चालू देण्याबाबत मनधरणी करण्यासाठी शनिवारी खुद्द काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी लोकसभेतील विरोधी पक्ष नेत्या सुषमा स्वराज यांची भेट घेतली. मात्र पंतप्रधानांच्या राजीनाम्याशिवाय संसदेचे कामकाज चालू देणार नाही; या भूमिकेवर भारतीय जनता पक्ष ठाम आहे.
कोळसा खाण घोटाळा प्रकरणी नैतिक जबाबदारी घेऊन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी राजीनामा द्यावा; या मागणीसाठी भाजपने संसदेचे कामकाज ठप्प केले आहे. या समस्येतून मार्ग काढण्यासाठी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि पंतप्रधान मनमोहन सिंग यांना शिष्टाई करण्यात अपयश आल्यावर सोनिया गांधी यांनी पुढाकार घेऊन भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. मात्र भाजपने आपला हेका कायम ठेवला आहे.
पंतप्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर भाजप ठाम असून त्यासाठी संसदेत आणि संसदेबाहेरही लढाई अधिक तीव्र करू; असा इशारा पक्षाचे प्रवक्ते शाहनवाज हुसेन यांनी दिला आहे.
काँग्रेस पक्ष लोकशाही परंपरेला किती महत्व देतो ते सोनिया यांच्या पुढाकाराने दिसून आल्याचा दावा पक्षाच्या सूत्रांनी केला.