कुख्यात डॉन अरुण गवळीला जन्मठेप

मुंबई- शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्येप्रकरणी विशेष मोक्का न्यायालयाने कुख्यात गुंड अरुण गवळीसह नऊ जणांना शुक्रवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. गवळीला सात लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. अन्य एका गुन्हेगाराला दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली.

जमिनीच्या वादातून गवळीने आपल्या साथीदारांसह 30 लाख रुपयांची सुपारी घेऊन जामसंडेकर यांच्या हत्येचे कारस्थान घडविले, असा ठपका गवळीवर ठेवण्यात आला होता. त्याप्रकरणी त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. मुंबईतील गुन्हेगारी जगतासाठी हा महत्त्वाचा निकाल आहे.

जामसंडेकर हत्येप्रकरणी माजी आमदार आणि डॉन अरुण गवळीला यापूर्वी मोक्‍का न्‍यायालयाने दोषी ठरविले होते. जामसंडेकर यांची 2 मार्च 2008 रोजी हत्‍या झाली होती. असल्पा गाव येथील प्रभाग क्रमांक 152 ची निवडणूक जिंकल्‍यानंतर जामसंडेकर यांची हत्‍या करण्‍यात आली होती. निवडणुकीत अजित राणेचा पराभव झाला होता. त्यामुळे जामसंडेकर यांच्या हत्येची गवळीला सुपारी देण्यात आली होती. पत्नी आणि मुले शाळेच्या स्नेहसंमेलनासाठी गेल्यानंतर जामसंडेकर घरात एकटेच असताना दोन हल्‍लेखोरांनी त्‍यांच्‍यावर गोळ्या झाडल्‍या होत्‍या.

न्यायालयाचे न्या. पी. के. चव्हाण यांच्यापुढे आज गवळीसह संदीप गांगण, श्रीकृष्ण गुरव, प्रताप गोडसे, अजित राणे, सुरेश पाटील, विजयकुमार गिरी, सुनील घाटे, अशोक जयस्वाल, नरेंद्र गिरी, अनिली गिरी आणि साहेबराव भिंताडे या बारा आरोपींना हजर करण्यात आले होते. गवळी याच्यावर भारतीय दंड विधान कलम 120(ब)नुसार जामसंडेकर यांच्या हत्येचे कारस्थान रचणे आणि संघटितपणे हत्येची अंमलबजावणी करणे (मोक्का कायदा कलम 3(2) व 3(1) नुसार दोषी ठरविण्यात आले होते.

Leave a Comment